Monday, 23 May 2016

एक वेडा (कविता)

एक वेडा

लिखाण : अभिजीत अशोक इनामदार

समाजात वावरताना बर्याचदा अशी माणसं भेटतात जी वेगवेगळे मुखवटे चढवून जगत असतात. आपलं खरं रूप दाखवीत नाहीत पण न जाणो कोणी त्यांना विरोध केला तर मात्र ते आकांडतांडव करतात... वादळी वार्यासारखे बरसतात... स्वतःला सिद्ध करण्यासाठी समोरच्याला ते चक्क वेडा ठरवतात. इतरांना त्रास देऊन, दुख्खीत करून आपण काहीच केलं नसल्याचा भाव चेहऱ्यावर धारण करून ही माणसं वावरत असतात.      

अशाच एका (जगाने वेडा ठरवलेल्या) वेड्याच्या नजरेतून केलेली हि कविता. वादळी वारा अन पाउस ही वरती म्हटलेल्या माणसांची प्रतीकात्मक रूपं आहेत.
         

आजकाल मला सगळं वेडं वेडं भासतय

वेडं आभाळ वेडं रान…

वेड्या सारखाच सुसाट भन्नाट धावणारा वारा...

लोकही आजकाल मला वेडपट म्हणू लागलेत…

मी पाहत राहतो त्या भन्नाट वाऱ्याच्या हालचाली

कित्त्येकांच्या घरांची छप्पर उडवून

त्या उघड्या बोडक्या घरांभोवती

घोंगावत राहणारा वेडा वारा...

पाउसही काहीसा असाच.... वेडसर....

कोसळत राहतो बेधुंद.... वेड्यासारखा

ते पाहून मग मात्र लोक हसू लागतात

माझ्या हालचाली त्यांना वेड्यासारख्या वाटतात…

मीही हसतो मला हसणार्यांकडे बघून

भुवया ताणून अन डोळे मिचकावून

आता मात्र वेडपट मधला पट गळून पडलाय

अन राहिलंय फक्त वेडा.... शुद्ध वेडा


आजकाल मला सगळं वेडं वेडं भासतय....


कोसळणारा पाऊस घोंगावणारा वारा थांबतो अचानकच

अन पाहत राहतो भिजलेल्या लोकांच्या हालचाली

मोडून पडलेले संसार अन निर्जीव डोळ्यातील पाणी

त्यावेळी मला मात्र त्या बावरलेल्या पावसाकडे

आणि गोंधळलेल्या वारयाकडे बघून हसावंस वाटतं

आपण काहीच केलं नसल्याच्या त्यांच्या

आविर्भावावर रडावसं वाटतं…

हसावं… कि रडावं… या गोंधळात मी असता

लोकांची शहानिशा पक्की होते

माझ्या डोळ्यातील वेडसर झाक नक्की होते


आजकाल मला सगळं वेडं वेडं भासतय.....

कधीतरी मग मी आरशापुढे उभा राहतो

स्वतः च स्वतःकडे पाहून उगाचच हसतो

….यावेळी मात्र मला मी वेडा वाटत नाही

इतरांसारखा मला शहाणेपणाचा मुखवटा चढवता येत नाही कदाचित…

पण माझ्या या अवस्थेची मला कीव मात्र येत नाही…

आतून एक आणि बाहेरून एक असं असण्यापेक्षा

आतून बाहेरून एकच मग ते वेडंच का असेना

माझं मला ते भावतं कारण देखल्या देवा दंडवत पेक्षा

पूर्ण नास्तीकत्वच कधीतरी देवाला भावतं….

या विचारांनी मग मी पुनःश्च एकवार हसतो

स्वतः च स्वतःकडे बघून.... वेड्या सारखा. 

 
© अभिजीत इनामदार
  कामोठे, नवी मुंबई ४१०२०९

No comments:

Post a Comment