पहा... शोध घ्या... अन बोध घ्या
...!!!
२ डिसेंबर २०१२
©अभिजीत अशोक इनामदार
कामोठे, नवी मुंबई ४१० २०९.
माझी आई महाराष्ट राज्य शासनाच्या
आरोग्य विभागात कार्यरत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील बांबवडेजवळील कापशी नामक एका खेडेगावात
तिची उपकेंद्र प्रमुख म्हणून नियुक्ती आहे. तिच्या बऱ्याच जबाबदाऱ्या आहेत अन त्यातील
सगळ्यात महत्वाची म्हणजे प्रसूती करणे. अन ती सातत्यानी ती जबाबदारी पार पडत आलेली
आहे. दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी सकाळी एका महिलेला काही मंडळी घेऊन आली आणि तिची प्रसूती
करावयाची आहे असे समजले. आम्ही मुलांनी नाकं मुरडली, कारण आज दिवाळी अन ही प्रसूती
म्हणजे आईचा सगळा दिवस ह्यातच जाणार, आम्हाला तिला वेळ देता येणार नाही, त्यापरत्वे
ही नाराजी. पण पूर्णवेळ रहिवासी उपकेंद्र प्रमुख म्हणून तिची नियुक्ती असल्याने आणि
शिवाय आरोग्य विभाग ही अत्त्यावश्यक सेवा असल्याने काही इलाज नव्हता.
आईने त्या महिलेची तपासणी केली
व साधारण ३ तासात प्रसूती होईल असेल सांगितले व ती पुढील तयारीला लागली. महिले बरोबर
जी काही नातेवाईक मंडळी आली होती ती वाट पाहत बसली की आता काय होणार? आगदी ठरल्या प्रमाणे
३ तासात प्रसूती झाली. आमची राहण्याची जागा व प्रसूती ग्रह ह्यांच्या मध्ये फक्त एक
भिंत. प्रसूती झाल्याचे कळले ते बाळाच्या रडण्याच्या आवाजाने. पण पुढे काहीच ऐकू येईना.
नंतर काही ऐकू येऊ लागले ते म्हणजे काही मुसमुस, काही उसासे आणि अरेरे....
कारण मुलगी झाली होती.... ह्या
महिलेला आधीच दोन मुली आहेत आणि आता ही तिसरी.
त्या महिलेची शुद्ध हरपली....
कारण मुलगी झाली होती.
नातेवाईकांचे चेहरे पडले होते....
कारण मुलगी झाली होती.
त्या नवजात पिल्लाचा पिता तिथे
हजार नव्हता अन तिच्या आगमनानी तो लगेच आलाही नव्हता..... कारण मुलगी झाली होती.
प्रसूती होऊन ३ - ४ तास लोटले
तरी त्या चीमुराडीचे आजी आजोबा तिला पाहायला आले नव्हते...... कारण मुलगी झाली होती.
आता कसे वागावे हेच मला समजत
नव्हते.
त्या बाईंची तब्येत खराब होऊ
लागली. त्यांची शुद्ध हरपली. पुढील उपचाराची सोय उपकेंद्रात नसल्याने आईने त्यांना
जवळील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलवण्यास सांगितले. त्या बाईंचे दीर व जाऊबाई सोबत
होते. त्यांनी गाडीची सोय केली. त्या बाईना गाडीत आणून झोपवण्यात आले. नुकत्याच जन्मलेल्या
त्या चिमुरडीला तिची काकू बाहेर घेऊन आली. त्या बाळाला त्यांनी केवळ एका पातळशा कापडात
गुंडाळून तसेच बाहेर आणले. पाय तसेच उघडे… डोके तसेच उघडे…. हेच बाळ जर मुलगा असता
तर त्याला असेच वागवले असते? त्याला व्यवस्थित झाकून, उबदार कपडे घालून बाहेर आणला
असता.... पण काय करणार मुलगी झाली होती ना. जसे काय एखादा अपराध घडावा किंवा आयुष्यातील
सगळ्यात मोठी चूक घडावी अशी अवस्था त्या बाईंची होती. मंडळी गाडीत बसून गेली. त्यांना
प्राथमिक आरोग्य केंद्रात व्यास्थित पोहचवण्यास म्हणून आई देखील त्यांच्या सोबत गेली.
मी विचारात पडलो अजून ही आपली
हीच परिस्थिती? मुलगा वा मुलगी होणं हे स्त्रीच्या हाती नाही हे कितीही कानीकपाळी ओरडून
सांगून सुद्धा काही फरक नाही? आपण इतके बोलतो या विषयी... इतके जनजागृती कार्यक्रम
चालू आहेत पण तरीही हीच अवस्था? आपण म्हणतो मुलगी मोठी होऊन मुलासारखीच कर्तुत्ववान
बनेल, घरच्यांची काळजी घेईल, घराचा आधार होईल. पण ती मोठी होत असताना तिची तशीच काळजी
घेतली जाते का जशी एखाद्या मुलाची घेतली जाते? आगदी साधी गोष्ट पहा एका छोट्या रोपट्याला
गरज असते ती मायेच्या उबेची जिव्हाळ्याच्या ओलाव्याची ते मिळाले तरच रोप नीट वाढते
अन पुढे मोठे झाड वा वृक्ष होते बहरते... फुले फळे देते. हे पण आगदी तसच आहे. पण ह्याउलट
त्या रोपट्याची नीट निगा राखलीच नाही तर? तर कसे ते वाढेल अन बहरेल? मुलीच्या जन्माचच
ज्या ठिकाणी दुखः असेल तिथे तिच्या वाढण्या अन बहरण्याबद्दल काय अपेक्षा करणार म्हणा?
त्या दिवशी त्या बाईंना त्या
मुली ऐवजी जर मुलगा झाला असता तर त्या बाई बेशुद्ध पडल्याच नसत्या कदाचित. मुलगी झाली
म्हणजे आता आपल्याला सासरचे नीट वागवणार नाहीत हे तिने स्वतःच ठरवले असल्यास काय करणार?
अशा महिलांची मानसिकता कशी बदलणार? मुलगी झाल्याचं दुःख प्रत्यक्ष जन्मदात्रीलाच होत
असेल तर इतरांची काय कथा? आता काळ बदलला. शहरी भागात लोकांची मानसिकता थोड्या फार फरकानी
का होईना पण बदलली आहे नाही असे नाही. पण गावो गावी अजून हे असेच चालू आहे अन अशाच
घटना अजूनही घडत आहेत.
यामध्ये विचार करण्यासारखी गोष्ट
अशी कि असा विचार करणारी स्त्री चुकीची कि तिला तसा विचार करायला भाग पडणारी परिस्थिती?
मुलगा झाला वंशाला दिवा मिळाला कि मग कदाचित सगळे आपल्याशी नीट वागतील व आपल्याला नीट
वागवतील या शक्यतेच्या आशेवर प्रत्येक वेळी प्रसूती वेदना सोसणाऱ्या त्या समस्त माता
चुकीच्या कि त्यांची तशी मानसिकता घडवणारे घरचे आणि आजूबाजूचे लोक?
पहा.... शोध घ्या.... अन बोध
घ्या....!!!!
ता. क.
सगळेच जण अशा मानसिकतेचे आहेत
असे माझे म्हणणे नाही. तथा प्रस्तुत लिखाण हे समाजातील अशा मानसिकतेच्या घटकांवर प्रकाश
टाकण्यासाठी केले आहे बाकी आपण सुज्ञ आहातच.... कळावे इति.
©अभिजीत अशोक इनामदार
कामोठे, नवी मुंबई ४१० २०९.
No comments:
Post a Comment