Monday, 23 May 2016

सूर निरागस हो (लेख)

सूर निरागस हो

दिनांक : १६ मे २०१६
लिखाण : अभिजीत इनामदार

आज बर्याच दिवसांनी काहीतरी लिहायला घेतले. मध्यंतरी आमच्या लाडक्या कन्येचे आगमन अन नंतर तिचे मुंबईच्या घरी आगमन झाले. त्यामुळे ऑफिस अन घर अशा दोन्ही आघाड्यांवर मुबलक प्रमाणात व्यस्तता होती. त्या दिवसात बर्याच जणांनी फोन करून, चाट मध्ये, मेसेज करून, पोस्ट करून मी कुठे आहे वगैरे विचारले. सध्या ओंनलाइन दिसत नाहीस, पोस्ट वगैरे काहीच नाही अशीही विचारणा झाली. पण मी कारण सांगितल्यावर सगळ्यानी पाठींबा दिला.

पण तुम्हाला सांगतो धमाल येतेय. म्हणजे तसा हिमान्शुच्या वेळचा अनुभव पाठीशी आहेच पण तरीही प्रत्येक मुलाची काहीतरी स्पेशालिटी असतेच नाही का? त्यानुसारच आमची वेदिका ही शहाणी बाळ… दिवसा व्यवस्थित झोपून वगैरे घेते (दिवसा बाबा ऑफिसात आई कामात उगाच दोघांना कशाला त्रास... नाही का? म्हणून बिचारी झोपून घेते ;) ;) ) अन मग रात्रीच्या वेळी जेवणाची वेळ झाली की म्याडम जाग्या होतात. आई अन बाबा एकदम एकत्र कसे काय जेऊ शकतात? असे कधी असते का? म्हणून मग ती आम्हाला वेग वेगळे जेवण्यची संधी देते…. म्हणजे एकाने तिला घेऊन बसायचे अन एकाने जेऊन घ्यायचे. त्यात भरीस भर आमचे मास्टर हिमांशू... आई किंवा बाबा कोणीतरी भरवल्याशिवाय जेवत नाहीत. त्यामुळे ते पथ्य सांभाळायचे. हे सगळे आवरून कसेबसे जॆउन घ्यायचे... बाकीची आवरा आवरी करायची. म्याडम तोपर्यंत दोघांपैकी कोणा एकाकडे किंवा पाळण्यात छान झोपी जातात. चला आज लवकर झोपायला मिळेल असे म्हणून आम्ही अंथरुण घालतो अन जरा पाठ टेकली की म्याडम जाग्या. एवढासा जीव... सगळंच कसं चिमणं चिमणं... एवढंसं पिणं, एवढीशी झोप, परत काहीतरी शी-शु... परत भूक… परत पिणं... परत थोडी झोप अन परत पुन्हा उठणं. दिवसभर बाकीच्या कामांनी, तिला घेऊन बसून सौभाग्यवती दमतेच... मग मीच तिला म्हणतो मला शक्य आहे तोवर मी जागतो तू झोपून घे.

पण तुम्हाला सांगतो ह्या सगळ्यात मज येते.... कुठलीही चिडचिड किंवा त्रागा होत नाही. मग काय एक पिल्लू सोबत अन दुसरं पाळण्यात… अन मग आमची मेहफील सजते.  आपण गाऊ शकतो… ते ही फक्त बाथरूम मध्ये हे माहिती असणारा मी… पण आता आमचे गाणे बाथरूम मधून बाहेर पडून हॉल अन बेडरूम पर्यंत पोहचले आहे. कारण आता इथे ये खाली बस... ये गप ये येड्या... उगा रडू नको रे बाबा… असे म्हणणारे कोणीही नसते. मास्टर हिमांशू माझ्या सुरात सूर मिसळून माझ्या मागून गाण्याच्या एक एक लाइन्स म्हणत असतो अन जर प्रज्ञाचा डोळा लागला असेल तर आमचा एकमेव श्रोता... वेदिका पाळण्यात किंवा माझ्या मांडीवर लक्ष देऊन गाणी ऐकू लेगतो. मधून मधून हसून दाद देखील देतो. बर ही गाणी आम्ही तिला झोप यावी म्हणून म्हणत असतो... पण बहुदा आमचा आवाज, सूर अन चेहऱ्यावरचे भाव बघून तिला झोप येत नसावी… उलट आपले बाबा अन दादा आपल्यासाठी हा कुठलातरी करमणूक प्रधान कार्यक्रम सादर करतायत की काय असे तिला वाटते की काय असा एक मला प्रश्न पडलाय. ती मोठी झाली की मी तिला विचारणार आहे ह्याबद्दल. :) :) :)

तर ते असो... पण मग कल्याणकारी रामराया... देवराया… या समर्थांच्या भजनानी सुरु होणारा आमचा सदाबहार गाण्यांचा कार्यक्रम एक एक अंगाई गीतांची वळणं घेऊ लागतो. पण इथेही एक अडचण असते. मराठी अंगाई गीतांचा आमचा साठा म्हणजे अत्यंत तोकडा.... राजा राणीची नको… चिऊ काऊ ची नको... गोष्ट सांग आई मला रामाची… किंवा लिंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई झालं… कि आमची अंगाई गीतं संपतात... मग भावगीत, भक्तीगीत, मधेच बाबुजींच एखादं गाणं अशा प्रकारे रेल्वेने फटाफट रूळ बदलत, स्टेशन मागे टाकीत जावे तशी आमची गाणी बदलत जातात. काहीच वेळात मग आता काय म्हणावे हा प्रश्न पडू लागतो. आमचा शांत झालेला आवाज बघून आमचा श्रोता लगेच आपला सूर लावतो अन पुढच्या गाण्याची मागणी करतो. अन अशा वेळी आमच्या मदतीला धाऊन येणारी त्रिमूर्ती म्हणजे मला श्री गुरुदत्त स्वरूपच वाटतात. होय ती तीन महान व्यक्तिमत्वं म्हणजे... किशोर दा, रफी साहेब आणि मुकेश साहेब. त्यांची अजरामर अशी अनेक गाणी मला पाठ आहेत, त्यांचे बोल मनात असे रुतून बसलेले आहेत अन मुळात रात्रीच्या चढत्या प्रहरात मृदू आवाजात म्हणता येण्यासारखी या त्रीमुर्तींची बरीचशी गाणी आहेत. बर माझ्याकडे नवीनात नवीन म्हणजे किमान ३ - ४ वर्षांपूर्वी आलेल्या नवीन हिंदी चित्रपटातील गाणी आहेत. नवीन एकही गाणे लक्षात राहत नाही त्यामुळे ते सलीम सुलेमान असो किंवा अरिजित सिंग असो आम्ही आपले ह्या त्रीमुर्तींचे भक्त. त्यामुळे प्यार दिवाना होता है मसताना होता है... पाठोपाठ.... कौन है जो सपनो में आया... कौन है जो दिल में समाया येते. दुनिया बनानेवाले क्या तेरे मन में सामाई असे मुकेश साहेबांनी विचारताच किशोरदा मेरे सपनो की रानी कब आयेगी तू... असे विचारतात. रफी साहेबांनी मुझे इश्क है तुझीसे... मेरी जाने जिंदगानी म्हणताच किशोरदा केहना है केहना है... आज तुमसे ये पहली बार किंवा दिल आज शायर है गम आज नगमा है म्हणतात.

अशा प्रकारे तास दोन तास कसे जातात ते कळत नाही. सौ.ना सुधा तेवढीच जरा विश्रांती मिळून जाते अन मुख्य म्हणजे आमचे श्रोते अन सहगायक कुरकुर न करता कार्यक्रम ऐकत राहतात.

परवाच सहज सत्ते पे सत्ता मधील प्यार तुम्हे कीस मोड पे ले आय गुणगुणत होतो तेव्ह्चा प्रसंग आहे: मास्टर हिमांशूला हे गाणे माहित नव्हते. ते म्हणताना बत्तीया बुझा दो.... हे सुरात अन “अरे बत्ती तो बुझा दे यार….” असा डायलॉग आहे. ते ऐकून हिमान्शुला एवढी मजा वाटली की त्या दोन लाइन्स ना… सुरातील बात्तीया बुझा दो आणि “अरे बत्ती तो बुझा दे यार….” असा डायलॉग यांना किमान १० - १२ वेळा वन्स मोर मिळाला. लेकरू जाम खुश झालं होतं ते ऐकताना अन खूप हसत होतं. खरी गम्मत तर पुढे झाली. त्याने बत्तीया बुझा दो म्हणजे काय ते विचारले. त्याचा अर्थ सांगून झाला अन पुढच्या लाईनला त्याने आमची विकेट घेतली. आमच्याकडे सकाळी झाडू पोछा करायला येणाऱ्या बाईना आम्ही भाभी म्हणतो. अन त्या आमच्याच इमारतीत तळमजल्यावर राहतात. बत्तीया बुझा दो नंतर त्याच कडव्यात पुढे जेव्हा बच्चन साहेब म्हणतात शःशःशः शोर ना मचाओ वरना भाभी जाग जायेगी.....  ही लाइन ऐकून मास्टर हिमांशू लगेच आगदी निरागसपणे म्हणाला म्हणजे आपल्या खालच्या भाभी? माझ्या अन प्रज्ञाच्या हसून हसून पोटात दुखायची वेळ आली.

अशाच काही काही गमती जमती सध्या सुरु असतात. सध्या प्रज्ञा  मुलांना घेऊन माहेरी गेलीय. त्यामुळे रात्रीचा सदाबहार गाण्यांचा कार्यक्रम बंद आहे कारण सहकलाकार अन श्रोता दोघेही गायब आहेत.

पण दोन आठवड्यांनी जेव्हा परत येतील तेव्हा पुन्हा जोमाने हा कर्यक्रम सुरु होईल यात काही शंका नाही. मास्टर हिमांशू... अरे बत्ती तो बुझ दे यार असे काहीतरी म्हणेल अन पुन्हा एकदा हास्याचे कारंजे उडतील अन स्वर्गसुखानी घर न्हाउन निघेल. 


©अभिजीत अशोक इनामदार
  कामोठे, नवी मुंबई ४१० २०९.

No comments:

Post a Comment