कारण... तो बाप असतो
दिनांक : १९ जून २०१६
बायको जरी ऑपेरेशन थिएटर मध्ये
प्रसूती वेदना सहन करत असली तरी
तिच्या अन होणाऱ्या काळजीने ज्याचा
चेहरा काळवंडलेला असतो कारण...
तो बाप असतो
इवलासा जीव समोर आल्यावर, बायकोच्या
डोळ्यातलं हसू बघून
जो जगाच्या जागी गद्गदतो कारण....
तो बाप असतो
ऑफिस, कामाचा ताण, वाढणाऱ्या
जबाबदाऱ्या ह्या सगळ्यांशी सामना करीत असताना
घरी आल्यावर झोपी गेलेल्या बाळ
गोपाळांच्या डोक्यावरून मायेचा हात फिरवतो कारण....
तो बाप असतो
चिमण्या पाखरांना पहिल्यांदा
शाळेत सोडताना टिपं गाळणाऱ्या बायकोला समजावताना
उगी काय सारखं सारखं हळव व्हायचं
म्हणताना त्याचा स्वर कातर होतो कारण...
तो बाप असतो
स्कूल बसने जायची सवय नसलेल्या
पाखरांना स्कूलबसने जायला लाऊन
त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी
बसच्या मागे गाडीवर जाउन स्कूलच्या गेटवर जाउन उभा राहतो कारण... तो बाप असतो
थकून भागून घरी आल्यावर लेकाच्या
हट्टापायी
त्याला खांद्यावर बसूवुन फिरवतो
कारण...
तो बाप असतो
शाळा, नंतर कॉलेज अश्या एक एक
पाहिऱ्या चढणाऱ्या मुलांच्या
पाठीशी जो भक्कम पणे उभा राहतो
कारण...
तो बाप असतो
इतरांना काहीच अप्रूप नसलेल्या
परीक्षा, स्पर्धा,
यातील मुलांच्या यशाबद्दल भरभरून
बोलत राहतो कारण...
तो बाप असतो
लेकीच्या लग्नासाठी, लेकाच्या
शिक्षणासाठी कर्ज काढतो
ते फेडण्यासाठी दुप्पट कष्ट करतो
कारण...
तो बाप असतो
आपलेल्या झिजलेल्या चप्पलेचा,
विरलेल्या शर्टचा जास्त विचार करत बसत नाही
कारण मुलाच्या मुलीच्या आनंदापुढे
त्याला बाकी काही नको असते कारण…
तो बाप असतो
आपल्या मुलांबद्दल कोणी काही
म्हटलं तर
त्याला बरोबर उत्तर देत असतो
कारण….
तो बाप असतो
आता पाखरं नोकरी, करिअर नावाच्या
आकाशात भरारी घेत असतात
पण त्याचे दोन मिचमिचे डोळे त्या
पाखरांवर नजर ठेऊन असतात कारण...
तो बाप असतो
लेक फॉरेन ट्रीपला जाणार म्हणून
त्याचा उर भरून येतो, मुलगा नको म्हणत असतानाही
एअरपोर्टवर फक्त गेट मधून आता
जाणाऱ्या मुलाला बघता यावे म्हणून रात्री १.३० - २ वाजेपर्यंत जागतो कारण... तो बाप
असतो
आता मुलाला / मुलीला मुलं होतात,
ह्यांनी राखलेल्या दुधावर साय चढते
नातवंडांमध्ये रमून सुद्धा मुला-मुलीची
काळजी करत राहतो कारण...
तो बाप असतो
आपल्या मुलांचं लहानपण वेळेअभावी
न अनुभवता आलेला तो
आता नातवंडांच्या लीला पाहण्यात
रमून जातो कारण...
तो बाप असतो
लहानपणी मुलांना अंगाई... गोष्ट
सांगणे असे काहीच करू न शकलेला तो
आता नातवंडांना गोष्टी सांगताना
थकत नाही कारण...
तो बाप असतो
म्हातारपणी लुकलुकणारी मान सांभाळत
श्रीराम श्रीराम म्हणताना सुद्धा
माझ्या मुला-बाळांना सुखात ठेव
अशीच प्रार्थना करत असतो कारण...
तो बाप असतो
©अभिजित इनामदार
कामोठे, नवी मुंबई
No comments:
Post a Comment