Monday, 25 July 2016

अजून किती निर्भया...!! (लेख)

अजून किती निर्भया...!!

दिनांक : 22 जुलै 2016
लेखन: अभिजीत अशोक इनामदार
 

कोपर्डी, अमरावती ह्या ताज्या बातम्या पाहून पुन्हा एकदा मन हेलावून गेले. खरेच आपला समाज - आपण नक्की कोणत्या दिशेने जात आहोत? पशूपासून उत्क्रांती होऊन आपला माणूस झाला खरा पण माणसातले माणूसपण संपूवून पुन्हा माणसाला पुन्हा उलट दिशेने... पशु होण्याकडे जाण्याची इच्छा का होते हे मला समजत नाही.

कोणी म्हणाले अमुक तमुक प्रकारचे सिनेमे पाहून लोक असे करतात? म्हणजे तसे सिनेमे आले नाहीत तर महिला मुलींवर अत्याचार होणार नाहीत? किती हास्यास्पद विधान आहे हे... अरे ज्यांना कोवळ्या अल्पवयीन मुलीवर सुद्धा दया येत नाही त्यांना माणूस तरी कसे आणि का म्हणावे? ह्या सगळ्या गोष्टींना कोणी मुलींना दोष दिला, त्यांचे कपडे, राहणीमान इत्यादी गोष्टींना दोष दिला, कोणी सरकारी यंत्रणेला दोष दिला, कोणी सिनेमा चित्रपटांना दोष दिला तर कोणी अजून कशाला दिला. पण मला सांगा कोणीही ह्या सर्वाला आपण जबाबदार आहोत असे म्हणताना का आढळत नाही? ही जबाबदारी मी, तुम्ही आपण साऱ्यांनी समाज म्हणून घ्यायला नको का? काहींना पटणार नाही पण त्यासाठी एक गोष्ट सांगतो.

आम्हाला आमच्या ऑफिसमध्ये ठराविक कालावधी नंतर पुन्हा पुन्हा काही ट्रेनिंग्स दिली जातात. पैकी वर्कप्लेस हऱ्याशमेंट हे एक महत्वाचे ट्रेनिंग. त्यामध्ये तीन व्यक्ती शोधल्या जातात पीडित व्यक्ती, अत्याचार करणारा वा करणारी व्यक्ती आणि ते सारे निमूटपणे पाहणारी व्यक्ती (ऑब्झर्वर).

पीडित व्यक्तीला त्यांच्यावरील अन्यायाची माहिती देण्यासाठी वेगवेगळे मार्ग जसे की प्रत्यक्षात जाऊन सांगणे, मेल करणे, फोन करणे हे दिलेले आहेतच पण त्यातून कोणी सांगू शकत नसेल किंवा अन्याय करणारी व्यक्ती उच्चपदस्थ असेल तर काम कठीण होते. म्हणूनच ऑब्झर्वर (म्हणजेच हे सगळे पाहणारी व्यक्ती) त्याचा रोल सुद्धा महत्वाचा असतो. ती व्यक्ती जर अन्याय करणाऱ्या व्यक्तीची बाजू घेऊन बोलू लागली किंवा वागू लागली तर त्याचे रूपांतर ऑब्झर्वर मधून अन्याय करणाऱ्यांत रूपांतरित होते. म्हणून त्यांनी सुद्धा काळजीपूर्वक राहणे - वागणे गरजेचे असते. आपल्या समोर जर असे काही घडत असेल तर आपण ते शांतपणे न पाहता त्याविरुद्ध आवाज उठावाने गरजेचे असते. ती व्यक्ती अगदी गुप्तपणे पण हे काम करू शकते. पण तसे करणे गरजेचे आहे.

आपला समाज हा ऑब्झर्वरची भूमिका नीट नाही का बजावू शकत? हो पण ही भूमिका थोडी जास्त महत्वपूर्ण आहे. कारण त्यासाठी सुरुवात आपल्यापासून आपल्या घरातून करावी लागेल. आपल्या मुलांना अगदी संस्कारक्षम वयापासूनच मुलींबद्दल आदर राखणे, त्यांचा मान सन्मान जपणे ह्या गोष्टी शिकवणे गरजेचे आहे. अर्थात आमची मुले असे काही करणार नाहीत अशी बऱ्याच जणांची खात्री असते पण ते फक्त स्वतःपुरते मर्यादित ना ठेवता जर एखादे वांड मूल आजूबाजूला दिसत असेल तर त्यालाही हे समजावून सांगणे गरजेचे आहे.

मुळात मेल फिमेल रेशो जो कमी आहे त्याला आपणच जबाबदार नाही आहोत का? तुम्ही आम्ही किंवा आपल्या आधीच्या काही पिढ्यांनी वंशाचे दिवटे हवेत म्हणून कित्येक निरागस कोवळे जीव तंत्रज्ञानाचा गैरवापर करून जन्माला येण्यापूर्वीच ती केवळ मुलगी आहे म्हणून अक्षरशः कुरतडून कुरतडून मारून टाकले नाहीत काय? अन ते कमी म्हणून आता तेच दिवटे जन्माला आलेल्या निरागस कोवळ्या मुलींचे वखवखलेल्या लांडग्यांप्रमाणे लचके तोडत असताना आपण फक्त हतबल होऊन पाहत राहायचे? हे खरेच माझ्या बुद्धीच्या पलीकडचे आहे.   

सगळ्याच गोष्टी सरकार करेल नाहीतर आम्ही सरकारला धारेवर धरू म्हणणारे… सरकारनेच घालून दिलेले किती नियम पाळतात? राज्य लोकांनी निवडून दिलेले सरकार चालवत जरी असले तरी हे राज्य हे लोकांचे राज्य आहे ना? लोकशाही असलेल्या राज्यात सगळ्क्या गोष्टी सरकार ने करून भागेल काय? आपण ह्या देशाचे नागरिक म्हणून सर्व नियमांचे पालन का करू शकत नाही? का अजूनही कुठेतरी जाऊन लिंगभेद चाचणी केली जाते? हा कायद्याने गुन्हा आहे हे माहीत असताना सुद्धा? प्रत्येक वेळी का आपल्यावर कोणीतरी लक्ष ठेवायला हवे... पोलिसिंग करायला हवे? आपले आपण मनाने हे नियम नाही का पाळू शकत? अन जर तसेच असेल तर मग कशाला लोकशाही अन लोकांचे राज्य वगैरेच्या बाष्कळ गप्पा झोडायच्या? त्यापेक्षा मग तो साहेबाचा हंटर बरा होता ना, त्या भीतीने का होईना लोक कायदा पाळायचे असे म्हणायची वेळ खरेच नको यायला.

उगाच त्या स्त्री पुरुष समानतेच्या गप्पा, महिलांची गगनभरारी ह्या चर्चा करण्यात काय अर्थ आहे? कालच एक महिलेचा पहिली ट्रेन ड्रायव्हर म्हणून व्हाट्सअपवर फोटो आला होता, मध्यंतरी हैदराबाद मध्ये काही महिला भारतीय एअर फोर्स मध्ये फायटर पायलट म्हणून रुजू झाल्याची बातमी होती पण ह्या अशा गोष्टी आठवून आठवून उदाहरणे द्यावी लागतात ह्यातच सगळे नाही का आले?

सरकार, कायदा आणि सुव्यवस्था जे काही करायचे असेल ते करेलच आणि त्यांना ते करणे गरजेचे आहेच. पण सगळ्याच गोष्टी कोणीतरी येऊन आपल्यासाठी करेल ही भावना सोडायला हवी. आपण एक चांगला समाज म्हणून काय करू शकतो हे पाहायला हवे. आपण आपल्या मुलांना इतके चांगले संस्कारित करूयात की भविष्यात ती मुले असे काही करणार नाहीत याची खात्री वाटायला हवी. ती खात्री जोपर्यंत आपल्याला पटत नाही तोपर्यंत माझ्यासारखे मुलींचे बाप मात्र सुखाची झोप घेऊ शकणार नाहीत.     

©अभिजित अशोक इनामदार
  कामोठे, नवी मुंबई  

Wednesday, 20 July 2016

झिंगाट प्रेम (लेख)

झिंगाट प्रेम
 
दिनांक : 12 जुलै 2016

लेखन: अभिजीत अशोक इनामदार

मध्यंतरी एक मराठी सिनेमा आला... करोडो रुपये कमावले त्या सिनेमाने. दोन कोवळ्या मनांची प्रेमकहाणी अन त्याचा होणार शेवट अशी ही कथा होती. पेपर मध्ये आमुक अमुक चित्रपटाचा इफेक्ट अन फलाना जिल्ह्यातील 12 - 13 प्रेमीयुगुल फरार अशी बातमीही वाचनात आली. हे म्हणजे असे झाले की जर हा चित्रपट आलाच नसता तर हे पळून गेले नसतेच. अशी खात्री आहे काहो? अहो अशा विषयाचा हा पहिलाच सिनेमा आहे का? अर्थात आपल्याकडील तरुण तरुणी हे फिल्म स्टार्सना त्यांचा रोल मॉडेल समजतात अन त्यांच्या सिनेमांचा त्यांच्या मनावर चांगलाच पगडा असतो पण म्हणून आपण काय करतोय ह्याचे भान अगदीच हरवून जावे? कितीतरी जुन्या हिंदी चित्रपटांमध्ये सुद्धा नायक नायिका असेच पळून गेले आहेत, जंगलात राहिले आहेत. लाकडी घरात राहिले आहेत. अशा वेळी नायिका "तुम काम पे जाओगे मै खाना बनाऊंगी और तुम्हारी राह देखुंगी" वगैरे वगैरे म्हणते. पण असे करणे हे कितपत शहाणपणाचे आहे हे कळण्याचे ते वय नसते हेच खरे.

मुळात सिनेमा नाटकात किंवा टीव्ही सिरियल्स मधील प्रेम हेच खरे प्रेम अशी जी काही भावना असते तीच मुळात चुकीची. अर्थात सगळ्याच सिनेमा किंवा टीव्ही सीरिअल्स वर माझा आक्षेप नाहीये. पण बऱ्याचदा यंग जनरेशनचा गोंधळ होताना दिसतो.

अर्थात ज्यांची आपली ठाम मते आहेत, किंवा त्याबद्दलचे त्यांच्या कुटुंबाने त्यांच्यावर केलेले संस्कार आहेत त्यांच्या बद्दल मी बोलत नाही. पण जे उगाच वाहवत जातात त्यांनी वेळीच स्वतःला सावरणे महत्वाचे असते.

दहावी किंवा बाराव्वी नंतर ना धड लहान मूल ना एकदम समजूतदार प्रौढ अशी साधारण जी अवस्था आयुष्यात येते. तेव्हा अपोसिट सेक्स बद्दल वाटणारे औत्सुक्य किंवा ओढ ही अगदी सर्वसामान्य गोष्ट आहे. पण त्या गोष्टींना त्या वयात किती महत्व द्यायचे हे कळणे खूप महत्वाचे असते. जेंव्हा कधी एखादा तरुण किंवा तरुणी ह्या गोष्टींमध्ये गुरफटून जातात तेव्हा त्यांना समजावताना निराळ्याच गोष्टींचा संदर्भ दिला जातो. जसे की त्यांची आपली जात वेगळी आहे, त्यांची आपली बरोबरी नाही होऊ शकत, गरिबी श्रीमंती वगैरे पैलू त्याला जोडले जातात. पण मुळात त्यामागील मानसिकता ह्या वयातील अल्लडपणा ह्या मुलांना त्यांची आयुष्य घडवण्यासाठीची जी मोलाची अन महत्वाची वर्षे असतात तीच हिरावून टाकतात ह्यावर किती भर दिला जातो?

मुळात ह्यांच्या लेखी प्रेम म्हणजे काय हे तपासून पाहणे गरजेचे आहे. शारीरिक आकर्षण हे एक मुख्य कारण असू शकते. पण त्या नंतर काय? समजा त्यातून काही समस्या झालीच तर ती निभावून न्यायाची ताकत अन कुवत दोन्हीही त्या कोवळ्या मनांमध्ये असते काय? बरं चला ती गोष्ट निभावून नेली तर पुढे काय? नकळत्या वयात आलेले पालकत्व पेलण्याची ताकत कुठून येणार? शिवाय पुढील सगळ्याच गोष्टी, स्थैर्य, त्यासाठी लागणारा आर्थिक आधार हा कुठून येणार? डोश्याच्या गाडीवर किंवा साधारण कुठल्याशा कंपनीमध्ये काम करून सगळ्याच गोष्टी सध्या होत नाहीत. 132 कोटीच्या पुढे लोकसंख्या (आजचा गुगल नुसरचा आकडा) असलेल्या देशात मुळातच संधी कमी आहेत. असे असताना न कळत्या वयात नको ते निर्णय घेऊन कसे चालेल बरे? ह्या गोष्टींचे भान तरुण पिढीला किंवा नुकत्याच तारुण्यात येऊ घातलेल्या पिढीला देणे गरजेचे आहे. प्रेम ही खूप चांगली संकल्पना आहे. ती मनामध्ये जरूर असावी, पण प्रेम मिळवण्याच्या नादात कुठल्याही थराला जाण्याचा प्रकार तरुणाई ने करू नये.

मुला मुलींनी काय करावे:

- जशा आपल्या भावना आहेत तशाच इतरांच्याही भावना असणार त्याचा आदर ठेवावा. आपल्याला वाटणारी प्रेमभावना समोरच्याला जाणवलाच असे नाही. तसे नसल्यास त्या गोष्टीचा खिलाडू वृत्तीने स्वीकार करावा. आणि आयुष्यात पुढे जावे. प्रेम भंगाचे दुःख जरी मोठे असले तरी आयष्य खूप सुंदर आहे हे लक्षात ठेवावे.

- आपल्याला नक्की काय हवे आणि आयुष्यात काय करायचे आहे हे पक्के करावे. स्वतःचे स्वतः ठरवता येत नसल्यास पालकांशी संवाद साधून ह्यावर मार्ग काढावा. घरातील व्यक्ती तुम्हाला तुमच्या जन्मापासून ओळखतात अन बहुतांश वेळा ते तुमचे भलेच इच्छितात.   

- जर कोणाबद्दल आकर्षण जाणवत असेल तर त्यात स्वतःला वाहवून जाऊ देऊ नये.

- ह्या वयात आपण हे सगळे पेलण्यास समर्थ आहोत का स्वतःच स्वतःला विचारावे.

- प्रेम, लग्न ह्या गोष्टी बाहुलीच्या  खेळा इतक्या सोप्या नसतात. तिथे आयुष्यभर साथ देण्याची तयारी, मानसिकता असावी लागते.

- आपल्याला विरोध करणाऱ्यांपासून पळून जाऊन आपण आयुष्यात सुखी होऊ असे काही नसते.

- लहान वयात सगळ्या जबाबदाऱ्या उचलण्यास आपण तयार आहोत का? ह्याचा विचार करावा.

- सिनेमा मध्ये वगैरे दाखवतात तसे कोणीतरी आपल्या मदतीला धावून येईल अशी फुकाची अपेक्षा ठेऊ नये.

- शिक्षण, करिअर सोडून फक्त प्रेमासाठी म्हणून पळून जाऊन… आपण कमाई कशी करणार? होणाऱ्या / झालेल्या पती वा पत्नीला आणि स्वतःला कुठे ठेवणार? शरीरसुख काही मिनिटे आनंद वा सुख देईल... त्यानंतर भूक वगैरे लागत नाही असे काही होत नाही. दिवसातून 3 - 4 वेळा खायला कुठून आणणार?

- जाती धर्माच्याही पेक्षा मी म्हणेन ज्या वातावरणात... ज्या घरात आपण वाढलो, ज्या सवयीनी आपण आत्तापर्यंत जगत आलो... दुर्दैवाने त्या सगळ्या शिवाय रहावे लागले किंवा आपल्या सवयीच्या अगदी विरुद्ध जगावे लागले तर आपण राहू शकू का? ह्याचा आधी विचार करावा. नंतर पश्चाताप करून वा वाईट वाटून घेऊन काही उपयोग नसतो. अशा वेळी बऱ्याचदा हातात काहीही उरत नाही.        

- शिक्षण पूर्ण नसताना आपल्याला चांगली नोकरी लागेल वा चांगला धंदा बसेल अशी आशा ठेवणे मूर्खपणाचे लक्षण असते. इथे चांगल्या संधीच्या शोधात सगळेच असतात हे विसरून चालणार नाही.

- आपण सगळ्या पासून लांब दूर निघून जाऊ जिथे दुसरे कोणी असणार नाही फक्त तू आणि मी… असे संवाद सिनेमा नाटकात चांगले वाटतात. प्रत्यक्ष आयुष्यात तसे शक्य नसते. सध्याच्या टेकनॉलॉजिच्या जगात तुमचा कधी ना कधी, कसा ना कसा पत्ता लागू शकतो हे लक्षातच ठेवावे. त्या शिवाय सगळ्या पासून लांब अशी कुठलीही जागा नसते. मनुष्य कितीही म्हणाला तरी आयुष्यभर जंगलात वगैरे राहू शकत नाही.

- त्यातूनही तुम्ही लांब जाऊन पोहोचलात तरी मन हा असा प्रकार आहे जो तुम्हाला, तुम्ही जिथून पळून आलात तिथे क्षणात नेऊन ठेऊ शकते. आपल्यांच्या विरहात जगणे हे फार कठीण काम असते.

एकूण काय... प्रेम करा जरूर करा. प्रेम खूप चांगली गोष्ट आहे. ती तुमच्यातली माणुसकी जिवंत ठेवेल. पण त्याच बरोबर आपले शिक्षण, करिअर, छंद ह्या गोष्टी जपा. प्रेमाची झिंग जरूर असावी पण झिंगाट प्रेमाच्या हट्टापायी आपल्या समोरच्या छान सुंदर आयुष्यात आपल्याच हाताने माती कालवणे काही योग्य नाही. प्रेम हे तुमच्या प्रगतीला पूरक असावे अधोगतीला लावणारे नसावे. आपले आयुष्य आपण घडवण्याची कुवत आपल्यात आणा अन मग काय हव्या त्या भराऱ्या घ्या. गगनभरारी घेण्यासाठी पंखांमध्ये आवश्यक असणारे बळ आधी पंखांमध्ये येऊ द्या. उगाच गगनभरारी घेण्याच्या नादात कुठे भेलकांडलात तर झडप घालू पाहणाऱ्या हिंस्र श्वापदांची इथे कमी नाही हे ही ध्यानी असू द्या.    

©अभिजित अशोक इनामदार
  कामोठे, नवी मुंबई  

(सदर लेख तारुण्यावस्थेत पदार्पण करणाऱ्या सर्व तरुण वर्गाला वाचण्यास द्यावा. माझ्या वॉल वरून तो शेअर करू शकता किंवा http://abhiinamdar.blogspot.com/ ह्या ब्लॉग वरती वाचू शकता.)     

Tuesday, 12 July 2016

मनोकामना (कथा)

मनोकामना  
दिनांक : 12 जुलै 2016
लेखन: अभिजीत अशोक इनामदार

पावसाच्या पाण्याचा घराच्या पत्र्यावर एकसारखा एका लयीत आवाज येत होता... कोणीतरी ताड ताड  ताशा वाजवावा तसा. मधूनच आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे ती लय थोडी बिघडत होती. त्यामुळेच पत्र्यावरील ताशा क्षण दोन क्षणांसाठी थांबल्यासारखा वाटे अन पुन्हा सुरू होई. रात्रभर पाऊस असाच कोसळत होता. आता चांगलं उजाडून गेलेलं 10 - 11 चा सुमार पण तरीही अगदी पहाट किंवा तिन्हीसांजेची वेळ असावी असे वातावरण. गावामध्ये काय दिवे जायला निमित्तच हवे. कालपासून धो धो पाऊस कोसळत होता मग तर  काही विचारूच नका. दिवे गेले नसते तरच नवल होते.
विसू तात्या त्यांची सकाळची सगळी कार्ये आटपून ओसरीवर बसले होते. खरेतर विश्वनाथ कुलकर्णी असे त्यांचे नाव पण गेल्या कित्येक वर्षांमध्ये त्या नावाचा उल्लेख कागदी पत्रव्यवहार सोडला तर कुठेही नव्हता. सगळ्या गावाचे ते विसू तात्याच आहेत. अगदी सज्जन गृहस्थ. कोणाच्या अध्यात नाही की मध्यात नाही. आपण भले अन आपले काम भले अशा खाक्याच माणूस तितकाच मावळ स्वभावाचा अन धार्मिक वृत्तीचा. तसे त्यांना रिटायर होऊन 15 वर्षे झालेली. म्हणजे त्यांनी नुकतीच वयाची पंचाहत्तरी गाठलेली. निस्सीम विठ्ठल भक्त. दरवर्षी वारीला जाणारा मनुष्य. घरच्या देवघरात अतिशय सुबक पितळेची विठ्ठल रखुमाईची मूर्ती होती. काय असेल ते असेल पण जे काही असेल ते पांडुरंगाला सांगावे आणि 'ठेविले अनंते तैसेचि राहावे... चित्ती असू द्यावे समाधान' असे त्यांचे वर्तन होते. पण तरीही मनात कसलीतरी रुखरुख होती अन ती स्पष्ट जाणवत देखील होती त्यांच्या चेहऱ्यावर.
दुपारच्या जेवणानंतर द्वारका माई म्हणजे तात्यांच्या सौभाग्यवती आणि गावाच्या माई बाहेर येऊन  बसल्या. तात्यांची घालमेल त्यांना समजत का नव्हती? उगाच का पण्णास वर्षे संसार केला होता त्यांच्या सोबत? पण करणार काय? गेली कित्येक वर्षे पायी वारीला जाणाऱ्या तात्यांना गेल्या 4 वर्षांत चालताना होणाऱ्या त्रासामुळे जाता आले नव्हते. मग आनंदा… तात्यांचा मुलगा दरवर्षी न चुकता त्यांना पंढरपूरला नेऊन आणत असे. पण ह्या वर्षी तेही अवघड वाटत होते.
तात्या - आनंदाचा काही फोन?
माई - अहो मेली रेंज कुठे आहे फोनला. अन त्याचे चार्जिंग देखील संपले. तरी सांगत होते आनंदास तो घरचा फोन ठेव म्हणून. हे मोबाईलच काही खरे नाही.
तात्या - उद्या एकादशी आली. आनंदाचा पत्ता नाही. फोन नाही.
माई - अहो मुद्दाम का करत असेल तो. नेमके त्याला जावे लागले ना कंपनीच्या कामासाठी. अन सुनिलाला सुद्धा सुट्टी मिळत नाहीये. गेल्या खेपेस तीच नव्हती आली मोटार चालवीत तुम्हाला पंढरपूर दर्शनाला न्यायला. मारे ऐटीत सगळ्यांना सांगितले होतेत ना... माझी सून आली मोटार घेऊन म्हणून.
तात्या - होय खरे. गेल्या खेपेस पण आनंदाला असेच काहीतरी काम होते अन यायला जमले नव्हते.
माई - आता आपणच समजून घ्यायला हवे नाही का? शेवटी पांडुरंग काय तुम्ही पहाल तिथे उभा आहे. इथूनच हात जोडू त्यास. त्यास का आपल्या अडचणी दिसत नाहीत? देव ना तो? मग? उगाच तुम्ही मनाला रूखरूख लावून घेऊ नका.
माईंच्या प्रेमळ दटावणीने, तात्या जरा स्वस्थ झाले. मुखाने पांडुरंग हारी... वासुदेव हारी नामजप सुरूच होता. काही वेळातच पाऊस जरा उघडला. दिवेलागणीच्या वेळी तर पूर्णपणे थांबला. पूर्ण दोन दिवसांनी गावात दिवे आले. जरा प्रसन्नता लाभली. देवापुढे दिवा लावून माई तुळशीपुढे दिवा लावण्यास गेल्या तोच दारात मोटारीचा उजेड अन हॉर्न ऐकू आला.
‘अहो आनंदा... आला हो’ अशी गद्गदलेली हाक माईंच्या तोंडून बाहेर पडली. तात्या उठून बाहेर आले अन एकदम प्रसन्न हसले.     
चहा पाणी, गप्पा, जेवणं ह्यात वेळ कसा गेला कळलंच नाही. आनंदाने सकाळी लवकरच पंढरपूरला जायला निघायचे आहे असे सांगून लवकर उठायला हवे असे सांगितले. मला पुन्हा माघारी जायचे आहे फक्त एक दिवस सुट्टी काढून आलो आहे असे सांगितले. पहाटे उठून आवरून आंनदाने आपल्या आई वडिलांना घेऊन पंढरपूरचा रस्ता धरला. दोन तासात पंढरपूर गाठले. एकादशीमुळे प्रचंड गर्दी... अशा गर्दीतही अगदी छान दर्शन झाले तात्या आणि माई सुखावून गेले. एवढा प्रवास करून शिवाय दर्शनाला थांबूनही पाय अजिबात दुखले नाहीत म्हणून तात्या आणखीनच खुश होते. पांडुरंग हारी... वासुदेव हारी…
संध्याकाळच्या आत माघारी घरी सुद्धा पोहचले. निदान जेऊन जा रे आनंदा... असे माई म्हटल्या पण पुढे उशीर होईल अन मला आजच पुण्यास पोहचायला हवे उद्या महत्वाचे काम आहे. असे म्हणून आनंदा चहा घेऊन नुकताच पुण्याच्या वाटेला लागला होता.
तात्या - शेवटी त्यालाच खरी चिंता. त्यानेच धाडला आनंदास अन आम्हाला दर्शन घडवले. पांडुरंग हारी ... वासुदेव हारी.
तात्यांच्या आनंदाची माईंना कल्पना होतीच खरी. आनंद होता तो त्यांची मनोकामना पूर्ण झाल्याचा. चला विठ्ठलापुढे दिवा लावून घेते… असे म्हणून माई उठल्या तोच वरच्या आळीतील दामू लगबगीने येताना दिसला.
दामू - अहो माई तुमचा फोन का बंद आहे? तुळशीपुढे उभा राहून दामू विचारात होता.
अरेच्चा काल रात्री दिवे आल्यापासून फोन चार्ज करायचा राहूनच गेला. आनंदाचा फोन यायचा म्हणून चार्ज केला जातो. आनंदा स्वतःच आला होता त्यामुळे फोनकडे लक्ष कोणाचे असणार म्हणा. 
माई - का रे दामू? झाले काय पण?
दामू - शिवाय मी आज दिवसात चार वेळा येऊन गेलो तर घराला कुलूप. होतात कुठे तुम्ही दोघे? काळजी वाटू लागली हो.
तात्या - अरे पण झाले काय असे?
दामू - अहो काही नाही... आनंदाचे मला चार पाच फोन आले. तुमचा फोन लागत नाही म्हणून आलो होतो. बर आता मला जायला हवे. कामं आहेत अजून. तुमचा फोन चालू करा अन आनंदास फोन करा लगेच. असे म्हणून दामू निघून गेला.
तात्या अन माई एकमेकांकडे पाहत राहिले. माईंनी फोन चालू केला. तोच फोन वाजला. आनंदाचाच होता. त्याला यायला जमले नाही म्हणून तो माफी मागत होता अन पुढच्या आठवड्यातच येऊन तुम्हाला पंढरपुरास घेऊन जाईन म्हणत होता. माईंना काही कळेनासे झाले. त्यांनी बर म्हणून फोन बंद केला अन घडला प्रकार तात्यांना सांगितला.
तात्या म्हणाले - आग कसे शक्य आहे. थट्टा केली असेल तुझी त्याने. मघाशीच नाही का गेला तो आपल्याला सोडून. त्या दामूला पण त्यानेच फोन करून सांगितले असणार. आजकालची मुलं काय थट्टा करतील ती पण इतक्या म्हाताऱ्या आई बापाची… नेम नाही. आता पुन्हा फोन तर येऊ दे चांगला खडसावतो त्यास.
माई - नाही हो... आवाज रडवेला होता त्याचा. मला तर थट्टा अजिबात वाटली नाही.
तात्या - पण हे कसे शक्य आहे? काल रात्री अन आज दिवसभर आनंदा आपल्या सोबतच तर होता ना.
तात्या माई विचारात पडले... काहीसे आठवून तात्या म्हणाले:
तात्या – अगं पण काल रात्री आनंदाचा फोन एकदाही कसा वाजला नाही. नेहमी कोणाचे ना कोणाचे फोन येत असतात त्यास?
माई - हो ना अहो. शिवाय कधीही भाकरी न खाणारा मुलगा... पण काल रात्री त्याने हट्टाने भाकरी अन पिठलं का करायला लावले त्याने?
तात्या - शिवाय गाडी आपली नेहमीची नव्हती. मी विचारले देखील तर जी मिळाली ती घेऊन आलो म्हणाला अन हसला. मला तर काही कळलेच नाही.
माई - आहो सगळ्यात जास्त आश्चर्य वाटले ते सकाळी… सकाळी गंध अन बुक्क्याचा टिळा लावून कमरेवर हात ठेऊन विठ्ठलासारखा उभा होता तेव्हा.
तात्या - काय सांगतेस काय?
माई - अहो त्याही पेक्षा पुढे म्हणजे… तुम्ही विठ्ठलाला अर्पण करायला गुंफलेला तुळशीहार उचलून गळ्यात घालणार होता. मी हलकेच त्याला म्हटले 'आनंदा अरे विठ्ठलासाठी गुंफलाय तो त्यांनी पहाटे' तर माझ्याकडे बघून हसला अन म्हणाला ' अगं मीच ना तो विठ्ठल' तर मी आपली बापडी हसले अन म्हणाले ‘चला पांडुरंगा… उशीर होतोय… आता निघायास हवे पंढरपुरास’. हसून चला चला म्हणाला मला.
तात्या - अगं काय सांगतेस काय?
असे म्हणून तात्यांचे डोळे चमकले... 'म्हणजे... म्हणजे तो साक्षात...'
म्हातारा म्हातारीच्या डोळ्यात खळ्ळकन पाणी आले... अन दोघेही त्यांची मनोकामना पूर्ण करणाऱ्या देव्हाऱ्यातील विठ्ठलापुढे बसून साश्रू नयनांनी गद्गदू लागले.
©अभिजित अशोक इनामदार
  कामोठे, नवी मुंबई