Thursday, 18 August 2016

१४ सेकंद

लेखन : अभिजीत अशोक इनामदार
दिनांक : 18 ऑगस्ट 2016

सकाळचे 10 - 10.30 वाजलेले. गर्दीचा बहर त्यातल्या त्यात कमी झालेला. आर्धी अधिक भरलेली बस निघण्याची डबल बेल झाली आणि गाडी पनवेल स्थानकातून बाहेर पडली. आपले मशीन चालू करून तिने तिकिटे फाडण्याचे काम सुरु केले. हो… नुकतीच तीन-चार महिन्यांपूर्वी पनवेल आगारात रुजू झालेली, सडपातळ बांध्याची, गोल चेहऱ्याची, सावळ्या वर्णाची, नाकी डोळी नीटस, केसांचा व्यवस्थित बो करून त्यावर व्यवस्थित काळी जाळीदार कॅप घातलेली, वाहकाच्या खाकी पेहरावात म्हणजे खाकी हाफ शर्ट आणि खालती खाकी प्यांट घातलेली ती एकदम खुलून दिसत होती. त्यात तिचे प्रसन्न स्मित हास्य वातावरण अजूनच प्रसन्न करीत होते.  

पुढच्याच स्टॉप वर तो बस मध्ये चढला. काही तरी चारपाच स्टॉप नंतरचे तिकीट काढले. समोर जाऊन रिकाम्या जागी बसला. रापलेला वर्ण, हातापायानी दणकट गडी, खुरटी दाढी वाढलेली, नाही म्हणायला कोणीतरी ओवाळल्याची खूण म्हणून कपाळावर लाल कुंकवाचा नाम आणि हातात स्पंजच्या गावाकडे मिळायच्या त्या टाईपच्या दोन मोठ्या राख्या. बाकी आज अंघोळ केली आहे का अशी शंका घ्यायला पुरेपूर वाव असा अवतार…

ती आता मागे बसलेल्या इतर प्रवाशांची तिकिटे काढण्यासाठी मागे गेलेली. आपल्याच कामात दंग असलेली. हा दर पाच मिनिटांनी मागे वळून तिच्याकडे पाहू लागला. अगदी लोचट किंवा अश्लील जरी नसली तरी काहीतरी हवे आहे अशी त्याची नजर होती. त्याचे तसे सारखेच मागे तिच्याकडे वळून पाहणे हळू हळू खटकू लागले होते.

बस जसजशी पुढे सरकत होती तशी गर्दी वाढत होती. नवीन आलेल्या माणसांच्या गर्दीत ती मागे जरा नजरेआड झाली की त्याच्या चेहऱ्यावरची बेचैनी वाढत होती. मध्ये मध्ये तर त्याने मागे वळून, उभा राहून तिच्याकडे पहिले. आता हे तिलाही कुठेतरी खटकत होते. तिने भुवया उंचावून "काय" असा नजरेनेच सवाल केला. काही नाही अशी मान हलवून करून तो खाली बसला. 

त्याचे सारखे सारखे वळून बघणे असह्य होऊन काही जणांच्या नजर जळजळीत झाल्या. काहींनी त्याच्यावर तोंडसुख घ्यायला सुरुवात केली.

- जाळलं मेल्याचं लक्षण हातात राखी बांधायची... अन दुसऱ्यांच्या पोरी/बहिणी रस्त्यावर पडल्यासारख्या लाळघोटेपणा करायचा - महिला वर्गातून एक प्रतिक्रिया

- नाहीतर काय? घरी पण बायकांना असाच निरखून बघतो कि काय कोण जाणे? - अजून एक अनुमोदन वजा प्रतिक्रिया

- काय पण एक एक नग असतात... एवढे बोलून पण पुन्हा वळून पाहतोय बघा.

बसमधील वातावरण हळू हळू तंग होण्याच्या मार्गावर. एव्हाना ती तिकिटे काढून पुढे येते. तिच्या हक्काच्या सीटवर टेकते. सुदैवाने म्हणा कि दुर्दैवाने पण तो तिच्या शेजारच्याच सीटवर विराजमान असतो. आता त्याला मान पूर्ण 180 अंशात फिरवायला न लागता फक्त 90 अंशताच वळवून ती दिसत असते.  

आता तिचा संयमही संपतो... आपले स्मितहास्य, लाघवीपणा गुंडाळून ती सुद्धा डोळ्यातून अंगार काढू लागते.

- अहो काय कधी बाई पहिली नाही काय? का लेडी कंडक्टर बघितली नाही. कधीचे वळून वळून बघताय? 14 सेकंदापेक्षा जास्तवेळ रोखून बघितले तरी आता मी पोलीस केस करू शकते म्हटलं... तुम्ही तर 14 मिनिटे झाली मला बघताय. काय प्रॉब्लेम काय आहे तुमचा? कितीही राग आला असला तरीही एकेरीवर न घसरता… पण आवश्यक ती जरब तिच्या आवाजात पटकन दिसून येते.

आता पुढे काहीतरी पाहायला मिळणार म्हणून बरेच बघे श्वास रोखून, डोळे ताणून बघू लागतात. आयष्यात अगदी छोट्या छोट्या गोष्टींपासून ते फार मोठ्या प्रॉब्लेम्स मुळे फ्रस्ट्रेट होऊन कोणावर तरी राग काढायचा म्हणून संधीच्या शोधात असणारे शर्टाच्या बाह्या सारून हात मोकळे करायला म्हणून सरसावतात...

तोच तो आशाळभूत नजरेने परत तिच्याकडे पाहतो. जागेवरून उठून उभा राहतो अन दरवाजाकडे सरकतो आणि म्हणतो

- अहो द्या लवकर. इतका वेळ तुमच्याकडे बघतोय म्हणजे लक्षात नाही आलं काय?    

ती पुन्हा आश्चर्यचकित होऊन, भुवया आणि खांदे एकदम उडवून पुन्हा नजरेनेच काय असे विचारते

तो - अहो ताई माझे राहिलेले 5 रुपये द्या हो. हे काय आता उरण फाटा आला... मला उतरायचंय.

सुमारे 14 सेकंद सगळेच जण त्याच्याकडे अचंबित होऊन पाहत राहिले अन नंतर काय झाले होते ते कळल्याबरोबर… एखाद्या गाडीच्या चाकातून हवा जाताना जसा फस्स्स आवाज येतो तसा काहीसा सामूहिक हसण्याचा बसभर आवाज झाला अन त्याच्या “अहो ताई” ह्या हाकेने तिच्या चेहऱ्यावर पुन्हा ते स्मितहास्य परतले...         

नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा ...!!!

©अभिजित अशोक इनामदार
  कामोठे, नवी मुंबई  

Thursday, 11 August 2016

वखार (लेख)

वखार

लेखन : अभिजीत अशोक इनामदार
दिनांक : 11 ऑगस्ट 2016

आत्ता जरी नवी मुंबईमध्ये राहत असलो तरी आमचे बालपण हे खेड्यात गेले असल्यामुळे बऱ्याचशा गावाकडच्या लहानपणीच्या आठवणी मनात तशाच घर करून आहेत. काळानुरूप आम्ही वाढलो, बदलत गेलो पण तिथल्या गोष्टींशी असलेली नाळ काही तुटत नाही. माझ्या लहानपणी मी माझ्या आईला आणि काकूला माझ्या वयाच्या 12 वर्षांपर्यंत तरी चुलीवर स्वयंपाक करताना पाहिले आहे. त्या काळी ग्यास, टीव्ही अशा गोष्टी दैनंदिन गरजेच्या प्रकारात न मोडता चैन सदरात मोडत असल्यानं साहजिकच त्या घरी उपलब्ध नव्हत्या.

नाही म्हणायला रॉकेल (हल्ली त्याला सॉफिस्टिकेटेड भाषेत केरोसीन की कायसे म्हणतात) वरती चालणारा एक स्टोव्ह होता. पण संपूर्ण घरातील माणसांचा नाष्टा, स्वयंपाक त्यावर होऊ शकत नसे त्यामुळे चूल पेटवणे हे गरजेचे असे. शिवाय मागच्या अंगणात आंघोळीचे पाणी तापवण्यासाठी एक वेगळी चूल होती. त्यामुळे चुलीशी तसे लहानपणापासून परिचित आहोत. तर ह्या चुलींना लागणारे इंधन म्हणजेच लाकडे, ग्रामीण बोलीमध्ये त्याला जळण किंवा सरपण असेही म्हणतात ते मिळण्याची जागा म्हणजेच वखार.

आमच्या घराशेजारीच शंकर भाऊंचे घर अन आणि रस्त्याच्या पलीकडे म्हणजे घरासमोर त्यांची लाकडाची वखार होती. तिथे काहीही बोर्ड वगैरे नव्हता. त्यांचा मुलगा दत्तू सुतार ती वखार चालवीत असे. माझ्या बालपणी तो जवळपास पंचविशी पार केलेला असावा. कायम निळा फुल्ल बाह्यांचा बनियन आणि खाली पांढरा लेंगा अशा अवस्थेत तो वखारीत वावरत असे. वखारीतच काय तर घरून वखारीत किंवा वखारीतून घरी जाता येता सुद्धा त्याचा हाच पेहराव असे. आयताकृती वखारीत आत मध्ये समोर उजव्या बाजूला सगळा लाकडांचा साठा असे. डाव्या बाजूला कव्हर्ड एरियामध्ये तो इतर सुतार काम करे. त्यामध्ये शेती साहित्याची म्हणजे नांगर, कुळव, फावडे, कुदळी, टिकाव वगैरेची दुरुस्ती किंवा नवीन साहित्य बनविणे, घराची दारे, खिडक्या, कपाटे वगैरे ही चाले. आमचे तिथे जाणे व्हायचे ते जळण आणण्यासाठी आणि रिकाम्या वेळेत तिथे खेळून धुडगूस घालण्यासाठी.

घरातले जळण संपले असेल आणि घरी काका किंवा बाबा कोणी नसेल तर मग काकू किंवा आई आम्हाला तिकडे पाठवीत असे. मग आम्ही जळण आणायला आलोय म्हणून सांगितले की आम्हाला दत्तू काका जळणाची लाकडे कोणती ते दाखवीत असे अन त्यातील लाकडे उचलून तराजूमध्ये ठेवायला सांगे. त्याकाळी बहुतांश वेळा मिळणारी लाकडे म्हणजे बाभळ किंवा लिंबाची असत. एक मण किंवा दोन मण जी काही सांगितली असतील तेवढी लाकडे तोलून झाली की मग आम्ही ती एक एक करून काढून खाली ठेवत असू. मग दोन्ही हात पुढे करायचे अन दुसऱ्याकोणीतरी त्या दोन्ही हातांवर आडवी लाकडे रचायची. ज्याच्या त्याच्या क्षमतेनुसार त्याला पेलेल एवढी लाकडे त्या हातावर झाली कि तो मग घराकडे जाई तो पर्यंत दुसऱ्या भावाच्या हातावर लाकडे दिली जात. अशा प्रकारे जळण आणणे ही घराची सामूहिक ऍक्टिव्हिटी पार पडे.

आता ती लाकडे वाहून आणताना हातांना ती टोचत, काहीवेळा ओरखडे उठत वा क्वचित प्रसंगी खरचटे पण त्याचे काही विशेष नसे. मागल्या खेपेस असे काही झाले म्हणून आम्ही पुढच्या खेपेस पुन्हा जळण आणायला गेलोच नाही असे कधी झाले नाही. उलट प्रत्येकवेळी उत्साहाने उड्या मारत आम्ही त्या वखारीत जात असू. बर आदल्या दिवशी संध्याकाळी लाकडे आणली की दुसऱ्या दिवशी सकाळी किंवा फार फार तर संध्याकाळी आमची आज्जी आणि दत्तू ह्यांचा एक लडिवाळ संवाद घडे.

आज्जी - दत्या मेल्या जळण दिलंस का काल रात्री?

वास्तविक आम्ही जळण आणलेल तिने पाहिलेला असत, पण विषय फोडायची तिची अशी एक विशिष्ठ पद्धत होती.

दत्तू - व्हय कि व माई काल रातांच्यालाच दिलहाय न्हवं तुमच्या नातवंडासंगंट

आज्जी - मग सुक्काळीच्या जरा चांगल काढून नाही का देता येत?

दत्तू - आव चांगलच तर दिलहाय न्हवं...

आज्जी - हुम्म्म तर तर मोठा सांगतोयस चांगलं दिलंय म्हणून... सगळीच तर बाभळ आहे

दत्तू - मग माई आता आता काय सागवानी लाकूड द्यायचा काय जळणाला?

असे म्हणून दत्तू खी खी खी करून हसे

आज्जी - मुडद्या तुला सागाचं लाकूड दे म्हणून म्हणाले का मी? पण जरा चांगली द्यायची ना?

दत्तू - म्हंजी कशी?

आज्जी - मेल्या लहान पोरं आलेली बघून सगळी ओली बाभळ दिलीस तू? वाळकी लाकडं द्यायला काय जीव जात होता कारे भडवीच्या...

दत्तू त्यावर हासे अन वखारीकडे चालू लगे...

लहानपणी कित्येक वेळा लाकडे आणली असतील पण हा संवाद मात्र काही बदलत नसे. आता बऱ्याच जणांना आजीच्या तोंडाचे शब्द म्हणजे शिव्या वाटतील. हो… म्हणजे हल्लीच्या जमान्यात एखाद्याला मूर्ख, गाढव म्हटले तरी ते शिवी दिली असे समजले जाते. पण त्यावेळी चालत्या बोलत्या जिवंत माणसाला मुडद्या म्हणणे म्हणजे त्याला तसे संबोधणाऱ्या व्यक्तीला आणि त्या मुडद्याला सॉरी सॉरी त्या माणसाला देखील काहीच गैर वाटत नसे. बोलताना वाक्यांमध्ये काही स्वल्पविराम, पूर्णविराम अर्धविराम, उद्गारवाचक चिन्हं ही असल्या शब्दांमधून व्यक्त होतं. अन तसे त्याचे कोणालाच काहीच वाटत नसे.      

पोटापाण्यासाठी, आमच्या शिक्षणासाठी आई-बाबा, काका-काकू गावातून बाहेर पडले. आजी आजोबा गेले. बराच काळ मध्ये लोटला… मग मधेच कधीतरी अशा आठवणींचे उमाळे मनामध्ये दाटून येतात. मन धावत धावत जाऊन म्हासुर्ण्यातील आमच्या आळीतील घराजवळील पिंपळाच्या पारावर जाते, नरसोबाच मंदिर दिसू लागते, घर दिसू लागते अन घरासमोरील दत्तूची वखारही दिसू लागते. मागे एकदा चुलत भावाच्या लग्नासाठी गावी जाणे झाले. घरासमोरील बिन नावाच्या लाकडी वखारीच्या भिंतीवर "श्रीदत्त कारपेंटर्स" अशी पाटी झळकत होती. बदलत्या कालानुरूप वखारीनेही आपले रूप बदलले होते तर. संध्याकाळी सहज म्हणून आत डोकावलो तर दत्तूशेटचा मुलगा कसल्याश्या लाकडावर रंधा मारून ते लाकूड गुळगुळीत करीत होता. मला बघून हसला आणि मला म्हणाला

पांडा - या अभिजीत शेट... आज कसे काय येणं केलं?      

मी - मी कसला बाबा शेट... आलो होतो म्हटलं गाठ घ्यावी म्हणून आलो.

पांडा - बरे झाले आलास बाबा. नाहीतरी आठवणीने हल्ली भेटायला कोण येतंय म्हणा? आणि त्यात तुम्ही पुण्या मुंबईला जाऊन राहिले आपली गाठ पडणार कशी म्हणा...

तिथेच बाजूला एका टेबलवजा बेडवर बसलेला दत्तू  मला दिसला. पांडाने सांगितले मी माईंचा नातू म्हणून... लगेच हरकून गेला… म्हाताऱ्या मिचमिच्या डोळ्यांनी माझ्याकडे पाहत

दत्तू - लैच मोठा झालास लेकरा वळखलाच न्हाई बघ…

मी - हो आता हल्ली येणं होत नाही

मग माझी जरा विचारपूस करून त्याने बाजूला खेळणाऱ्या त्याच्या नातवंडाला… राम्या घरी जाऊन वखारीत चहा पाठवायला सांग असे सांगितले. घर शेजारी जवळच असल्याने ते पिल्लू पण घरी गेले. मी नको नको म्हणत असताना त्याने मला हातानेच गप्प केले.

मग मीच म्हणालो - बाकी काय म्हणते वखार? आता पूर्वीइतकी लाकडे दिसत नाहीत. प्लायवूड अन संमाईकाच जास्त दिसतोय…

दत्तू - खरंय बाबा... पर आता काय करायच… जे चालतंय ते करायला होवं ना... आता काय कोण चूल पेटवतय? आमच्याच घरात ग्यास आलाय बाकीच्यांसारखाच… मग कोण जळण न्हेणार. शेतीच्या कामालाबी जास्ती करून लोखंडी हत्यार वापराट्यात न्हवं... मग काय फर्निचरची कामं चालू केली. त्या साठीच लागतंय बघ हे.

तेवढ्यात चहा आला... हल्ली ग्यासमुळे चहा देखील लवकरच होतो असे उगाचच वाटून गेले.

बदल हा तर निसर्गाचा सर्वात मोठा अविभाज्य घटक आहे आणि तो कितीही हवाहवासा असो वा नकोसा असो व्हायचा तो बदल होतच राहतो. माझ्या लहानपणी मी पाहिलेली बिन नावाची लाकडाची वखार आणि आत्ताचे श्रीदत्त कारपेंटर्स ही एकाच जागेची दोन रूपे होती. लाकडे घ्यायला आल्यावर लाकडाच्या ढिगाऱ्यांवर चढून झाले उड्या मारणे, त्यांच्या मागे लपून दुसऱ्याला वेगवेगळे आवाज काढून घाबरवणे, किंवा ठिकठिकाणी असलेल्या लाकडांच्या ढिगाऱ्यांमधून पळापळी करणे ह्या आठवणी झर झर डोळ्यापुढून सरकत होत्या. मी शोधात असलेल्या वखारीच्या खाणाखुणा आता बऱ्याचशा पुसट झाल्या होत्या. येत्या काळात त्या पूर्णपणे नाहिश्याही होतील आणि वखारीसारख्या ठिकाणीही आम्ही केलेल्या गमती जमती फक्त आठवणींच्या रूपानेच शिल्लक राहतील. आता तिथे असलेल्या प्लायवूड आणि सनमाईका ह्यांच्या थप्प्यांमधून का कोणास ठाऊक तो आपलेपणाचा फील मात्र येत नव्हता.

गप्पा संपवून मी उठलो आणि "श्रीदत्त कारपेंटर्स" मधून बाहेर पडलो आणि घराकडे चालू लागलो. अवखळ मन मात्र अजूनही दत्तूच्या वखारीतील लाकडांच्या ओंडक्यांमधून उगाचच पळापळी करीत होतं.  

…..©अभिजित अशोक इनामदार
    कामोठे, नवी मुंबई  
 

Wednesday, 10 August 2016

सुटका (कथा)

सुटका

लेखन : अभिजीत अशोक इनामदार
दिनांक : १० ऑगस्ट २०१६

शांतामामींचे प्रत्येक कामात असतानाही नेहमीच स्तोत्र पठण चाले. आज शुक्रवार त्यामुळे भल्या पहाटे पासूनच त्यांची दुर्गा कवचाची आवर्तने सुरु होती. अर्थात गोपाळमामांच्या घराला हे काही नवीन नव्हते. शांता मामी म्हणजे सगळ्या गावच्याच मामी. गोल चेहरा, नाकी डोळी नीटस, नऊवारी साडी आणि कपाळावर जुन्या बंद्या रुपया एवढे कुंकू. एकूणच.. एकदम प्रसन्न व्यक्तिमत्व त्यातून बोलण्यात तर खूपच मिठास.
आज सकाळपासून मामी जरा चिंतेतच होत्या कारण दोन दिवसांपासून लागलेला पाऊस काही थांबण्याचं नाव घेत नव्हता. घरात दिवस भरलेली... अवघडलेली सुनबाई सीमा. कालच त्या सरकारी दवाखान्यातल्या नर्स बाई येऊन गेल्या आणि म्हणाल्या इथे उपकेंद्रात डिलेव्हरी होण्यासारखी नाही हो. बाळ फिरल्यासारखे वाटते आहे. डांभेवाडीस न्यावे लागेल. तिला तिकडे आणा असे सांगून त्या डांभेवाडीस गेल्या खऱ्या. पण आता जायचे कसे हा एक मोठा प्रश्न होता... कालपासून गावाबाहेरच्या ओढ्यास पाणी खूप वाढले आहे. कोणीही माणूस, गाडी इकडची तिकडे जाऊ शकत नव्हते. त्यात त्यांचा मुलगा काल सकाळी कामावर गेला तो तिकडेच अडकून पडला होता. तो इकडे येऊ शकत नव्हता.
त्यात आज सकाळपासून सीमाच्या पोटात प्रचंड दुखू लागले होते. मामा पण अस्वस्थ होते काय करायचे असा प्रश्न होता. समजा गाडीची व्यवस्था किंवा अजून काही झाले नाही तर शेवटचा उपाय म्हणून मामींनी रखमा सुईणीला शंकर करवी भल्या पहाटेच निरोप धाडला होता. पण दिवस उगवला तरी अजून रखमा कशी आली नाही ह्या विचाराने मामी व्याकुळ झाल्या. सीमाच्या शेजारी बसून मायेने कपाळावरून हात फिरवताना त्यांनी तिला सगळ्या गोष्टींची कल्पना दिली. निदान रखमा मावशींना तरी बोलवा लवकर असे सीमाने म्हणताच त्या पुन्हा बाहेर ओसरीवर आल्या.
मामा अस्वस्थ फेऱ्या मारत होते.
मामी - अहो शंकर नाही आला का हो अजून? रखमेस घेऊन ये म्हणून सांगितले होते त्यास
मामा - अगं तो मघाच आला अन सांगून गेला. तुम्ही आत होता म्हणून हाक मारली नाही. कशी आहे सुंबाईंची प्रकृती?
मामी - अहो तिला कळा सुरु झाल्यात...
मामा - परमेश्वरा...
मामी - काय हो काय झाले? शंकर काय म्हणाला?
मामा - अगं रखमा घरी नाही म्हणाला… घराला कुलूप आहे म्हणे. शेजारी चौकशी केली तरी रात्रीपासूनच घर बंद आहे म्हणे.
मामी - अरे कर्मा... आता हो
मामा - तसा त्याने निरोप ठेवला आहे ती आल्या आल्या इकडे निरोप द्या म्हणून. आता तुम्हीच करा काय करायचे ते. मागल्या खेपेस सुमीच्या वेळेस तुम्हीच नाही केलंत तिचं बाळंतपण?
मामी - अहो त्या गोष्टीस झाली १० वर्षे. आता माझेच हात पाय लटपटतात. भीती वाटते हो.
मामा - हो पण काहीतरी करावे लागेलच ना
मामी - होय खरे... पण तुम्ही आत खोलीच्या बाहेर थांबा काही लागले तर आवाज देता येईल. अन तशी बाकी तयारी मी करून ठेवली आहेच
मामा - ठीक आहे तर मग
असे म्हणून दोघेही आत जायला वळले तोच एक मंजुळ आवाज कानी पडला
- शांता मामीचे घर हेच न्हवं?
मामा मामींनी वळून पाहिले एक स्त्री डोक्यावर खोप घेऊन उभी होती.
मामी - होय ग बाई... मीच शांतामामी? काय हवे होते?
- अहो मला रखमाने पाठवलंय तुमच्या सुनेसाठी...
मामींच्या चेहऱ्यावर अचानक आनंद झाला.
मामी - बरे झाले बाई आलीस वेळेवर. चल पायावर पाणी घे अन ये आत मी सगळी तयारी करून ठेवलीय खास. सुती कपडे, गरम पाणी, नाळ कापायला नवीन ब्लेडचे पान सगळे तयार आहे.
दोघीही भर भर आत निघून गेल्या. मामांना आता जरा धीर आला.
बऱ्याच वेळाने पण... लहानग्या बाळकृष्णाचा रडण्याचा आवाज वाडाभर गुंजला. मामींना काय करू अन काय नाही असे झाले. बाहेर येऊन त्यांनी गोड बातमी मामांना सांगितली, बाळ बाळंतीण सुखरूप आहेत म्हणाल्या अन पुन्हा आत गेल्या. बाळाचे बाळाच्या आईचे सगळे व्यवस्थित करून मग त्या बाई निघाल्या.
मामी - थांब जरा घोटभर चहा घेऊन जा.
- बरं
चहा झाला...
मामी - आगा तूस ओळखले नाही बाई मी
- अहो मी अंबिका न्हवं... माळ्याची. आव रखमा मावशीच्या घराच्या मागल्या बाजूला रहायला हाय न्हवं. मावशी काल रातच्याला गेली न्हवं तकडं डांभेवाडीस... मल्हा सांगून गेलीती. मामीचा सांगावा आला अन म्या नसन तर तू जा बाय म्हून. शंकर तकडं दुसऱ्या घरी निरोप ठिवून गेला.. त्यामुळं वाईच येळच झाला बघा.
मामी - असू दे असू दे पोरी... पण अगदी वेळेवर धावून आलीस बघ.
अंबिका - बर मल्हा अजून लई काम हायती... पुन्यांदा ईन बोलायला.
ती उठली तशी मामी म्हणाल्या अगं थांब तुझी ओटी भरते.
अंबिका - आता रहावं द्या मामी नंतर रिद्धी फिटली की सावकाश पोचती करा... काय गरबड न्हाय.
अन अजून काही बोलायच्या आधीच ती आली तशी निघूनही गेली.
मामींना बरीच कामं होती. आता वेळ नव्हता त्यांच्याकडे. दिवस मावळेपर्यंत पाऊस जरा उघडला. ओढ्याच पाणीही कमी झाल्याची वार्ता आली. काही वेळातच बाळाचे बाबा सुखरूप घरी आले. सगळं आनंदी आनंद झाला. काही वेळातच रखमा आली...
रखमा - मामी... ओ मामी
मामी - आत्ता आलीस होय रखमे. कधीची वाट बघत होते
रखमा - आव काय सांगू मामी वड्याच्या पल्याड दिसभर बसून व्हते न्हवं... कशी यायची व्हते सांगा? पर कशी हाय पोर?
मामी - अगो सकाळीच झाली सुटका तिची. मुलगा झाला.
रखमा - त्वांड ग्वाड करा मामी
मामी - होय बाई बस... अन बर झाल बाई तू अंबिकेला सांगून गेली होतीस ते.
रखमा आश्चर्याने मामींकडे पाहत म्हणाली
रखमा - अंबिका... कोण व अंबिका मला न्हाय ठाव.
मामी - अगं असा काय करतेस तूच नाही सांगून गेली होतीस कि तुला नाही जमले यायला तर तू जा म्हणून
रखमा - आव पर कोण आंबिका म्या न्हाय वळखत
मामी - अशी ग कशी धांदरट तू... स्वतःच विसरलीस
रखमा - आव पर... खरंच. कुठं र्हाती म्हून सांगितलं तिन्ह?
मामी - अगं तुझ्याच घराच्या मागे राहते म्हणाली.
रखमा - काय मामी... म्हाज्या घरा मागं एक तरी घर हाय का?
मामी - अगं हो खरेच की ते माझ्या लक्षात आलेच नाही. तुझ्या घरामागे काहीच नाही. थेट टेकाडावर अंबाबाईचे मंदिर… अधे मध्ये काहीच नाही. 
रखमा - व्हय तर ... नाव काय सांगितलं व्हतं?
मामी - अंबिका
रखमा - अंग म्हाझी माय... आन काय वटी बीटी भरली काय?
मामी - अगं मी थांब म्हणाले तर मला म्हणाली "आता रहावं द्या मामी नंतर रिद्धी फिटली की सावकाश पोचती करा... काय गरबड न्हाय".
रखमा - लई नशीबवान बघा मामी तुम्ही अन सुनबाय... आलं का ध्यानात कोण व्हती ती ते...
अन चिंब भिजल्या डोळ्यांनी मामींनी दुर्गाकवच म्हणायला सुरुवात केली...
श्रीगणेशाय नमः ||
ओंकाररूप श्रीगणेशातें
गं पहिले अक्षर जयाते
श्रीगजवदान त्या प्रभूतें
नमन माते दुर्गेसीही...||१||
देवी ! दुर्गे ! देई संरक्षण
कवच अंगी तव लेईन
गूढ सर्वसंरक्षक कथीन
अर्थहि नामांचा येथूनि ||२||....
…..
 
©अभिजित अशोक इनामदार
  कामोठे, नवी मुंबई