Wednesday, 20 July 2016

झिंगाट प्रेम (लेख)

झिंगाट प्रेम
 
दिनांक : 12 जुलै 2016

लेखन: अभिजीत अशोक इनामदार

मध्यंतरी एक मराठी सिनेमा आला... करोडो रुपये कमावले त्या सिनेमाने. दोन कोवळ्या मनांची प्रेमकहाणी अन त्याचा होणार शेवट अशी ही कथा होती. पेपर मध्ये आमुक अमुक चित्रपटाचा इफेक्ट अन फलाना जिल्ह्यातील 12 - 13 प्रेमीयुगुल फरार अशी बातमीही वाचनात आली. हे म्हणजे असे झाले की जर हा चित्रपट आलाच नसता तर हे पळून गेले नसतेच. अशी खात्री आहे काहो? अहो अशा विषयाचा हा पहिलाच सिनेमा आहे का? अर्थात आपल्याकडील तरुण तरुणी हे फिल्म स्टार्सना त्यांचा रोल मॉडेल समजतात अन त्यांच्या सिनेमांचा त्यांच्या मनावर चांगलाच पगडा असतो पण म्हणून आपण काय करतोय ह्याचे भान अगदीच हरवून जावे? कितीतरी जुन्या हिंदी चित्रपटांमध्ये सुद्धा नायक नायिका असेच पळून गेले आहेत, जंगलात राहिले आहेत. लाकडी घरात राहिले आहेत. अशा वेळी नायिका "तुम काम पे जाओगे मै खाना बनाऊंगी और तुम्हारी राह देखुंगी" वगैरे वगैरे म्हणते. पण असे करणे हे कितपत शहाणपणाचे आहे हे कळण्याचे ते वय नसते हेच खरे.

मुळात सिनेमा नाटकात किंवा टीव्ही सिरियल्स मधील प्रेम हेच खरे प्रेम अशी जी काही भावना असते तीच मुळात चुकीची. अर्थात सगळ्याच सिनेमा किंवा टीव्ही सीरिअल्स वर माझा आक्षेप नाहीये. पण बऱ्याचदा यंग जनरेशनचा गोंधळ होताना दिसतो.

अर्थात ज्यांची आपली ठाम मते आहेत, किंवा त्याबद्दलचे त्यांच्या कुटुंबाने त्यांच्यावर केलेले संस्कार आहेत त्यांच्या बद्दल मी बोलत नाही. पण जे उगाच वाहवत जातात त्यांनी वेळीच स्वतःला सावरणे महत्वाचे असते.

दहावी किंवा बाराव्वी नंतर ना धड लहान मूल ना एकदम समजूतदार प्रौढ अशी साधारण जी अवस्था आयुष्यात येते. तेव्हा अपोसिट सेक्स बद्दल वाटणारे औत्सुक्य किंवा ओढ ही अगदी सर्वसामान्य गोष्ट आहे. पण त्या गोष्टींना त्या वयात किती महत्व द्यायचे हे कळणे खूप महत्वाचे असते. जेंव्हा कधी एखादा तरुण किंवा तरुणी ह्या गोष्टींमध्ये गुरफटून जातात तेव्हा त्यांना समजावताना निराळ्याच गोष्टींचा संदर्भ दिला जातो. जसे की त्यांची आपली जात वेगळी आहे, त्यांची आपली बरोबरी नाही होऊ शकत, गरिबी श्रीमंती वगैरे पैलू त्याला जोडले जातात. पण मुळात त्यामागील मानसिकता ह्या वयातील अल्लडपणा ह्या मुलांना त्यांची आयुष्य घडवण्यासाठीची जी मोलाची अन महत्वाची वर्षे असतात तीच हिरावून टाकतात ह्यावर किती भर दिला जातो?

मुळात ह्यांच्या लेखी प्रेम म्हणजे काय हे तपासून पाहणे गरजेचे आहे. शारीरिक आकर्षण हे एक मुख्य कारण असू शकते. पण त्या नंतर काय? समजा त्यातून काही समस्या झालीच तर ती निभावून न्यायाची ताकत अन कुवत दोन्हीही त्या कोवळ्या मनांमध्ये असते काय? बरं चला ती गोष्ट निभावून नेली तर पुढे काय? नकळत्या वयात आलेले पालकत्व पेलण्याची ताकत कुठून येणार? शिवाय पुढील सगळ्याच गोष्टी, स्थैर्य, त्यासाठी लागणारा आर्थिक आधार हा कुठून येणार? डोश्याच्या गाडीवर किंवा साधारण कुठल्याशा कंपनीमध्ये काम करून सगळ्याच गोष्टी सध्या होत नाहीत. 132 कोटीच्या पुढे लोकसंख्या (आजचा गुगल नुसरचा आकडा) असलेल्या देशात मुळातच संधी कमी आहेत. असे असताना न कळत्या वयात नको ते निर्णय घेऊन कसे चालेल बरे? ह्या गोष्टींचे भान तरुण पिढीला किंवा नुकत्याच तारुण्यात येऊ घातलेल्या पिढीला देणे गरजेचे आहे. प्रेम ही खूप चांगली संकल्पना आहे. ती मनामध्ये जरूर असावी, पण प्रेम मिळवण्याच्या नादात कुठल्याही थराला जाण्याचा प्रकार तरुणाई ने करू नये.

मुला मुलींनी काय करावे:

- जशा आपल्या भावना आहेत तशाच इतरांच्याही भावना असणार त्याचा आदर ठेवावा. आपल्याला वाटणारी प्रेमभावना समोरच्याला जाणवलाच असे नाही. तसे नसल्यास त्या गोष्टीचा खिलाडू वृत्तीने स्वीकार करावा. आणि आयुष्यात पुढे जावे. प्रेम भंगाचे दुःख जरी मोठे असले तरी आयष्य खूप सुंदर आहे हे लक्षात ठेवावे.

- आपल्याला नक्की काय हवे आणि आयुष्यात काय करायचे आहे हे पक्के करावे. स्वतःचे स्वतः ठरवता येत नसल्यास पालकांशी संवाद साधून ह्यावर मार्ग काढावा. घरातील व्यक्ती तुम्हाला तुमच्या जन्मापासून ओळखतात अन बहुतांश वेळा ते तुमचे भलेच इच्छितात.   

- जर कोणाबद्दल आकर्षण जाणवत असेल तर त्यात स्वतःला वाहवून जाऊ देऊ नये.

- ह्या वयात आपण हे सगळे पेलण्यास समर्थ आहोत का स्वतःच स्वतःला विचारावे.

- प्रेम, लग्न ह्या गोष्टी बाहुलीच्या  खेळा इतक्या सोप्या नसतात. तिथे आयुष्यभर साथ देण्याची तयारी, मानसिकता असावी लागते.

- आपल्याला विरोध करणाऱ्यांपासून पळून जाऊन आपण आयुष्यात सुखी होऊ असे काही नसते.

- लहान वयात सगळ्या जबाबदाऱ्या उचलण्यास आपण तयार आहोत का? ह्याचा विचार करावा.

- सिनेमा मध्ये वगैरे दाखवतात तसे कोणीतरी आपल्या मदतीला धावून येईल अशी फुकाची अपेक्षा ठेऊ नये.

- शिक्षण, करिअर सोडून फक्त प्रेमासाठी म्हणून पळून जाऊन… आपण कमाई कशी करणार? होणाऱ्या / झालेल्या पती वा पत्नीला आणि स्वतःला कुठे ठेवणार? शरीरसुख काही मिनिटे आनंद वा सुख देईल... त्यानंतर भूक वगैरे लागत नाही असे काही होत नाही. दिवसातून 3 - 4 वेळा खायला कुठून आणणार?

- जाती धर्माच्याही पेक्षा मी म्हणेन ज्या वातावरणात... ज्या घरात आपण वाढलो, ज्या सवयीनी आपण आत्तापर्यंत जगत आलो... दुर्दैवाने त्या सगळ्या शिवाय रहावे लागले किंवा आपल्या सवयीच्या अगदी विरुद्ध जगावे लागले तर आपण राहू शकू का? ह्याचा आधी विचार करावा. नंतर पश्चाताप करून वा वाईट वाटून घेऊन काही उपयोग नसतो. अशा वेळी बऱ्याचदा हातात काहीही उरत नाही.        

- शिक्षण पूर्ण नसताना आपल्याला चांगली नोकरी लागेल वा चांगला धंदा बसेल अशी आशा ठेवणे मूर्खपणाचे लक्षण असते. इथे चांगल्या संधीच्या शोधात सगळेच असतात हे विसरून चालणार नाही.

- आपण सगळ्या पासून लांब दूर निघून जाऊ जिथे दुसरे कोणी असणार नाही फक्त तू आणि मी… असे संवाद सिनेमा नाटकात चांगले वाटतात. प्रत्यक्ष आयुष्यात तसे शक्य नसते. सध्याच्या टेकनॉलॉजिच्या जगात तुमचा कधी ना कधी, कसा ना कसा पत्ता लागू शकतो हे लक्षातच ठेवावे. त्या शिवाय सगळ्या पासून लांब अशी कुठलीही जागा नसते. मनुष्य कितीही म्हणाला तरी आयुष्यभर जंगलात वगैरे राहू शकत नाही.

- त्यातूनही तुम्ही लांब जाऊन पोहोचलात तरी मन हा असा प्रकार आहे जो तुम्हाला, तुम्ही जिथून पळून आलात तिथे क्षणात नेऊन ठेऊ शकते. आपल्यांच्या विरहात जगणे हे फार कठीण काम असते.

एकूण काय... प्रेम करा जरूर करा. प्रेम खूप चांगली गोष्ट आहे. ती तुमच्यातली माणुसकी जिवंत ठेवेल. पण त्याच बरोबर आपले शिक्षण, करिअर, छंद ह्या गोष्टी जपा. प्रेमाची झिंग जरूर असावी पण झिंगाट प्रेमाच्या हट्टापायी आपल्या समोरच्या छान सुंदर आयुष्यात आपल्याच हाताने माती कालवणे काही योग्य नाही. प्रेम हे तुमच्या प्रगतीला पूरक असावे अधोगतीला लावणारे नसावे. आपले आयुष्य आपण घडवण्याची कुवत आपल्यात आणा अन मग काय हव्या त्या भराऱ्या घ्या. गगनभरारी घेण्यासाठी पंखांमध्ये आवश्यक असणारे बळ आधी पंखांमध्ये येऊ द्या. उगाच गगनभरारी घेण्याच्या नादात कुठे भेलकांडलात तर झडप घालू पाहणाऱ्या हिंस्र श्वापदांची इथे कमी नाही हे ही ध्यानी असू द्या.    

©अभिजित अशोक इनामदार
  कामोठे, नवी मुंबई  

(सदर लेख तारुण्यावस्थेत पदार्पण करणाऱ्या सर्व तरुण वर्गाला वाचण्यास द्यावा. माझ्या वॉल वरून तो शेअर करू शकता किंवा http://abhiinamdar.blogspot.com/ ह्या ब्लॉग वरती वाचू शकता.)     

Tuesday, 12 July 2016

मनोकामना (कथा)

मनोकामना  
दिनांक : 12 जुलै 2016
लेखन: अभिजीत अशोक इनामदार

पावसाच्या पाण्याचा घराच्या पत्र्यावर एकसारखा एका लयीत आवाज येत होता... कोणीतरी ताड ताड  ताशा वाजवावा तसा. मधूनच आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे ती लय थोडी बिघडत होती. त्यामुळेच पत्र्यावरील ताशा क्षण दोन क्षणांसाठी थांबल्यासारखा वाटे अन पुन्हा सुरू होई. रात्रभर पाऊस असाच कोसळत होता. आता चांगलं उजाडून गेलेलं 10 - 11 चा सुमार पण तरीही अगदी पहाट किंवा तिन्हीसांजेची वेळ असावी असे वातावरण. गावामध्ये काय दिवे जायला निमित्तच हवे. कालपासून धो धो पाऊस कोसळत होता मग तर  काही विचारूच नका. दिवे गेले नसते तरच नवल होते.
विसू तात्या त्यांची सकाळची सगळी कार्ये आटपून ओसरीवर बसले होते. खरेतर विश्वनाथ कुलकर्णी असे त्यांचे नाव पण गेल्या कित्येक वर्षांमध्ये त्या नावाचा उल्लेख कागदी पत्रव्यवहार सोडला तर कुठेही नव्हता. सगळ्या गावाचे ते विसू तात्याच आहेत. अगदी सज्जन गृहस्थ. कोणाच्या अध्यात नाही की मध्यात नाही. आपण भले अन आपले काम भले अशा खाक्याच माणूस तितकाच मावळ स्वभावाचा अन धार्मिक वृत्तीचा. तसे त्यांना रिटायर होऊन 15 वर्षे झालेली. म्हणजे त्यांनी नुकतीच वयाची पंचाहत्तरी गाठलेली. निस्सीम विठ्ठल भक्त. दरवर्षी वारीला जाणारा मनुष्य. घरच्या देवघरात अतिशय सुबक पितळेची विठ्ठल रखुमाईची मूर्ती होती. काय असेल ते असेल पण जे काही असेल ते पांडुरंगाला सांगावे आणि 'ठेविले अनंते तैसेचि राहावे... चित्ती असू द्यावे समाधान' असे त्यांचे वर्तन होते. पण तरीही मनात कसलीतरी रुखरुख होती अन ती स्पष्ट जाणवत देखील होती त्यांच्या चेहऱ्यावर.
दुपारच्या जेवणानंतर द्वारका माई म्हणजे तात्यांच्या सौभाग्यवती आणि गावाच्या माई बाहेर येऊन  बसल्या. तात्यांची घालमेल त्यांना समजत का नव्हती? उगाच का पण्णास वर्षे संसार केला होता त्यांच्या सोबत? पण करणार काय? गेली कित्येक वर्षे पायी वारीला जाणाऱ्या तात्यांना गेल्या 4 वर्षांत चालताना होणाऱ्या त्रासामुळे जाता आले नव्हते. मग आनंदा… तात्यांचा मुलगा दरवर्षी न चुकता त्यांना पंढरपूरला नेऊन आणत असे. पण ह्या वर्षी तेही अवघड वाटत होते.
तात्या - आनंदाचा काही फोन?
माई - अहो मेली रेंज कुठे आहे फोनला. अन त्याचे चार्जिंग देखील संपले. तरी सांगत होते आनंदास तो घरचा फोन ठेव म्हणून. हे मोबाईलच काही खरे नाही.
तात्या - उद्या एकादशी आली. आनंदाचा पत्ता नाही. फोन नाही.
माई - अहो मुद्दाम का करत असेल तो. नेमके त्याला जावे लागले ना कंपनीच्या कामासाठी. अन सुनिलाला सुद्धा सुट्टी मिळत नाहीये. गेल्या खेपेस तीच नव्हती आली मोटार चालवीत तुम्हाला पंढरपूर दर्शनाला न्यायला. मारे ऐटीत सगळ्यांना सांगितले होतेत ना... माझी सून आली मोटार घेऊन म्हणून.
तात्या - होय खरे. गेल्या खेपेस पण आनंदाला असेच काहीतरी काम होते अन यायला जमले नव्हते.
माई - आता आपणच समजून घ्यायला हवे नाही का? शेवटी पांडुरंग काय तुम्ही पहाल तिथे उभा आहे. इथूनच हात जोडू त्यास. त्यास का आपल्या अडचणी दिसत नाहीत? देव ना तो? मग? उगाच तुम्ही मनाला रूखरूख लावून घेऊ नका.
माईंच्या प्रेमळ दटावणीने, तात्या जरा स्वस्थ झाले. मुखाने पांडुरंग हारी... वासुदेव हारी नामजप सुरूच होता. काही वेळातच पाऊस जरा उघडला. दिवेलागणीच्या वेळी तर पूर्णपणे थांबला. पूर्ण दोन दिवसांनी गावात दिवे आले. जरा प्रसन्नता लाभली. देवापुढे दिवा लावून माई तुळशीपुढे दिवा लावण्यास गेल्या तोच दारात मोटारीचा उजेड अन हॉर्न ऐकू आला.
‘अहो आनंदा... आला हो’ अशी गद्गदलेली हाक माईंच्या तोंडून बाहेर पडली. तात्या उठून बाहेर आले अन एकदम प्रसन्न हसले.     
चहा पाणी, गप्पा, जेवणं ह्यात वेळ कसा गेला कळलंच नाही. आनंदाने सकाळी लवकरच पंढरपूरला जायला निघायचे आहे असे सांगून लवकर उठायला हवे असे सांगितले. मला पुन्हा माघारी जायचे आहे फक्त एक दिवस सुट्टी काढून आलो आहे असे सांगितले. पहाटे उठून आवरून आंनदाने आपल्या आई वडिलांना घेऊन पंढरपूरचा रस्ता धरला. दोन तासात पंढरपूर गाठले. एकादशीमुळे प्रचंड गर्दी... अशा गर्दीतही अगदी छान दर्शन झाले तात्या आणि माई सुखावून गेले. एवढा प्रवास करून शिवाय दर्शनाला थांबूनही पाय अजिबात दुखले नाहीत म्हणून तात्या आणखीनच खुश होते. पांडुरंग हारी... वासुदेव हारी…
संध्याकाळच्या आत माघारी घरी सुद्धा पोहचले. निदान जेऊन जा रे आनंदा... असे माई म्हटल्या पण पुढे उशीर होईल अन मला आजच पुण्यास पोहचायला हवे उद्या महत्वाचे काम आहे. असे म्हणून आनंदा चहा घेऊन नुकताच पुण्याच्या वाटेला लागला होता.
तात्या - शेवटी त्यालाच खरी चिंता. त्यानेच धाडला आनंदास अन आम्हाला दर्शन घडवले. पांडुरंग हारी ... वासुदेव हारी.
तात्यांच्या आनंदाची माईंना कल्पना होतीच खरी. आनंद होता तो त्यांची मनोकामना पूर्ण झाल्याचा. चला विठ्ठलापुढे दिवा लावून घेते… असे म्हणून माई उठल्या तोच वरच्या आळीतील दामू लगबगीने येताना दिसला.
दामू - अहो माई तुमचा फोन का बंद आहे? तुळशीपुढे उभा राहून दामू विचारात होता.
अरेच्चा काल रात्री दिवे आल्यापासून फोन चार्ज करायचा राहूनच गेला. आनंदाचा फोन यायचा म्हणून चार्ज केला जातो. आनंदा स्वतःच आला होता त्यामुळे फोनकडे लक्ष कोणाचे असणार म्हणा. 
माई - का रे दामू? झाले काय पण?
दामू - शिवाय मी आज दिवसात चार वेळा येऊन गेलो तर घराला कुलूप. होतात कुठे तुम्ही दोघे? काळजी वाटू लागली हो.
तात्या - अरे पण झाले काय असे?
दामू - अहो काही नाही... आनंदाचे मला चार पाच फोन आले. तुमचा फोन लागत नाही म्हणून आलो होतो. बर आता मला जायला हवे. कामं आहेत अजून. तुमचा फोन चालू करा अन आनंदास फोन करा लगेच. असे म्हणून दामू निघून गेला.
तात्या अन माई एकमेकांकडे पाहत राहिले. माईंनी फोन चालू केला. तोच फोन वाजला. आनंदाचाच होता. त्याला यायला जमले नाही म्हणून तो माफी मागत होता अन पुढच्या आठवड्यातच येऊन तुम्हाला पंढरपुरास घेऊन जाईन म्हणत होता. माईंना काही कळेनासे झाले. त्यांनी बर म्हणून फोन बंद केला अन घडला प्रकार तात्यांना सांगितला.
तात्या म्हणाले - आग कसे शक्य आहे. थट्टा केली असेल तुझी त्याने. मघाशीच नाही का गेला तो आपल्याला सोडून. त्या दामूला पण त्यानेच फोन करून सांगितले असणार. आजकालची मुलं काय थट्टा करतील ती पण इतक्या म्हाताऱ्या आई बापाची… नेम नाही. आता पुन्हा फोन तर येऊ दे चांगला खडसावतो त्यास.
माई - नाही हो... आवाज रडवेला होता त्याचा. मला तर थट्टा अजिबात वाटली नाही.
तात्या - पण हे कसे शक्य आहे? काल रात्री अन आज दिवसभर आनंदा आपल्या सोबतच तर होता ना.
तात्या माई विचारात पडले... काहीसे आठवून तात्या म्हणाले:
तात्या – अगं पण काल रात्री आनंदाचा फोन एकदाही कसा वाजला नाही. नेहमी कोणाचे ना कोणाचे फोन येत असतात त्यास?
माई - हो ना अहो. शिवाय कधीही भाकरी न खाणारा मुलगा... पण काल रात्री त्याने हट्टाने भाकरी अन पिठलं का करायला लावले त्याने?
तात्या - शिवाय गाडी आपली नेहमीची नव्हती. मी विचारले देखील तर जी मिळाली ती घेऊन आलो म्हणाला अन हसला. मला तर काही कळलेच नाही.
माई - आहो सगळ्यात जास्त आश्चर्य वाटले ते सकाळी… सकाळी गंध अन बुक्क्याचा टिळा लावून कमरेवर हात ठेऊन विठ्ठलासारखा उभा होता तेव्हा.
तात्या - काय सांगतेस काय?
माई - अहो त्याही पेक्षा पुढे म्हणजे… तुम्ही विठ्ठलाला अर्पण करायला गुंफलेला तुळशीहार उचलून गळ्यात घालणार होता. मी हलकेच त्याला म्हटले 'आनंदा अरे विठ्ठलासाठी गुंफलाय तो त्यांनी पहाटे' तर माझ्याकडे बघून हसला अन म्हणाला ' अगं मीच ना तो विठ्ठल' तर मी आपली बापडी हसले अन म्हणाले ‘चला पांडुरंगा… उशीर होतोय… आता निघायास हवे पंढरपुरास’. हसून चला चला म्हणाला मला.
तात्या - अगं काय सांगतेस काय?
असे म्हणून तात्यांचे डोळे चमकले... 'म्हणजे... म्हणजे तो साक्षात...'
म्हातारा म्हातारीच्या डोळ्यात खळ्ळकन पाणी आले... अन दोघेही त्यांची मनोकामना पूर्ण करणाऱ्या देव्हाऱ्यातील विठ्ठलापुढे बसून साश्रू नयनांनी गद्गदू लागले.
©अभिजित अशोक इनामदार
  कामोठे, नवी मुंबई  
 
  

Wednesday, 22 June 2016

नांदी बदलाची... अशीही अन तशीही (लेख)

नांदी बदलाची... अशीही अन तशीही

दिनांक:  २२ जून २०१६
लिखाण : अभिजीत अशोक इनामदार

परवाच वटपौर्णिमा झाली. सगळ्यात जास्त लक्षात राहिलेली गोष्ट कोणती तर.. एक पिक्चर मेसेज तमाम व्हाट्सअप भर फिरत होता. हाफ प्यांट मध्ये पूजा करणाऱ्या ललनेचा पाठमोरा फोटो होता तो. अजूनही फिरत असणारच तो फोटो कारण कुठलीही बाई किंवा महिला किंवा मुलगी ह्या नेहमीच सॉफ्ट टार्गेट असतात. अमुक तमुक कपडे घालून फिरू नका, असे करू नका, तसे करा हे त्यांना सहजपणे सांगितले जाते. पण ह्याआधी हे सगळे करण्याआधी मी तसे सांगणारी अधिकारी व्यक्ती आहे का? हे कोणी तपासले आहे? अर्थात सणावाराला, समारंभाला आपल्याकडे महिला साडी नेसतात. बऱ्याचजणी अगदी आवडीने नेसतात. सणाला किंवा वडाच्या पूजेला नेहमी नटून थटून, सहावारी किंवा नऊवारी साड्या नेसून जाणाऱ्या स्त्रियाच आम्ही आम्ही आजपर्यंत बघत आलोत. हाफ प्यांट मध्ये वडाच्या पूजेला येणारी स्त्री हे जरा पचायला अवघड खरे... ही आहे नंदी बदलाची... अशीही

पण तिने कसे यावे हे ठरवणारे आम्ही कोण? ते तिचे तिने ठरवू द्या ना. अर्थात मला स्वतःला जर विचारले तर मला नक्कीच तिने साडी नेसून जाणे आवडले असते. पण हे झाले माझे मत. अमुक एक बाई ने मला वाटेल तसे वागावे असा हट्ट मी का करावा? मी तिने तसे जाणे ह्या गोष्टीचे जरी समर्थन करीत नसलो तरी तिचा तो फोटो ज्या प्रकारे व्हायरल झाला होता हे नक्कीच कौतुकास्पद नाही... नाही का?

बर ज्या कोण्या इसमाने हा फोटो काढला असेल त्याने तो अगदी शिताफीने तिच्या पाठीमागून काढला आहे. जर तिच्या तश्या जाण्याने संस्कृतीला ठेच वगैरे पोहचत असेल तर संस्कृती संरक्षण वगैरे करणाऱ्या लोकांनी तिच्या समोरून… तिला सांगून तिचा फोटो काढायला हवा होता. अन तू अशी आलीस आता भोग आपल्या कर्माची फळं. आम्ही हा फोटो सर्वत्र अपलोड करणार आहोत असे सांगून तरी काढायचा होता. आहे तसे करण्याची हिम्मत? अर्थात ती नसणारच म्हणा. चोरून लपून छापून फोटो काढणाऱ्यांच्या अंगी तेवढी धमक कुठली म्हणा. त्यानी काढला फोटो मागून गुपचूप अन दिला फोटो पाठवून व्हाट्सअपवर. एक ग्रुप वरून दुसरीकडे अन दुसरीकडून तिसरीकडे अन तिसरीकडून संपूर्ण जगभर...

ह्याच्याने नेमके काय सध्या झाले? आता पुरुष मंडळी बाहेर अगदी बिनदिक्कत बर्मुडा वर फिरत असतात (त्यामध्ये मी स्वतः सुद्धा आहे). त्यांचे कोणाचे असे फोटो व्हायरल होताना दिसत नाहीत. ही काय मानसिकता आहे हे माझ्या समजण्याच्या पलीकडचे आहे. उद्या जर तुमचा कोणी असाच फोटो तुम्हाला न सांगता काढला आणि दिला पाठवून व्हाट्सअप, फेसबुक वर तर चालेल तुम्हाला? किंवा तुमच्या कोणाच्या घरातील स्त्रीचा असा फोटो काढला तर चालेल?

हे सगळे व्हाट्सअप वर सुरू होते ते ठीक पण तथाकथित फेसबुक ग्रुप्स वर देखील हा फोटो यावा अन त्यावर कोणताही आक्षेप घेतला जाऊ नये हे खरेच दुर्दवी नव्हे काय? माझा मुद्दा मी पुन्हा मांडतोय... नक्कीच वडाच्या पूजेला ती साडी नेसून नाहीतर किमान पंजाबी ड्रेस घालून गेली असती तरी चालले असते असे वाटणे हे स्वाभाविक आहे. पण म्हणून तिचा असा फोटो काढून जगभर पाठवून… ह्या ह्या… हू हू… करणे हे कोणते सांस्कृतिक पणाचे लक्षण आहे? जर एवढेच वाटत होते… तर तिला थांबवून अहो ताई, माई, आक्का (हवे ते संबोधून) तुम्ही आजच्या दिवशी तरी किमान असे कपडे करून यायला नको होते... असे सांगण्याचा कोणी प्रयत्न केला? झाली कोणाची तशी हिम्मत? नाही ना… मग तिचा फोटो काढून व्हायरल करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? जर तसे स्पष्ट बोलण्याची हिम्मत होत नसेल तर तिचे फोटो काढून जगभर पसरवण्याचा देखील कोणालाही हक्क नाही.

हातात मोबाईल आलाय पण तो खऱ्या अर्थानी वापरावा कसा हे कधी कळणार? नकळत काढलेल्या फोटोंमध्ये सर्रास पणे स्त्रियांचेच फोटो जास्त असतात. पण त्याही पेक्षा जास्त गंभीर गोष्ट आता घडते ते फोटो मॉर्फिंग. कोणाचा तरी चेहरा अश्लील शरीराला जोड किंवा आहे त्या फोटो मधील स्त्रीचे कपडे मॉर्फिंग करून काढून टाक. मागे एकदा असाच एक महिलेचा फोटो व्हाट्सअप वर फिरत होता कि हि बाई फोन मध्ये इतकी बिझी आहे कि ट्रेन मध्ये बाथरूम मध्ये तिची सलवार विसरून आली आहे. स्किन कलरची सलवार मॉर्फिंग करून नाहीशी करायला जास्त वेळ लागत नाही पण... पण  कुठल्या सडक्या मनोवृत्तीतून हे जन्माला येतेय? हि अशी कशी इतकी वाईट प्रवृत्ती? हे असे काम करणाऱ्याना त्यांच्या कुटुंबातील स्त्रियांची अशी विटंबना झाली तर चालेल का? आपल्या आई, बहिण, मैत्रीण किंवा पत्नीचा फोटो असा व्हाट्सअपवर फिरत राहिला तर आवडेल काय?
कुठल्याही अनोळखी स्त्रीचा फोटो व्हाट्सअपवर टाकण्यापूर्वी किंवा आलेला कुठलाही फोटो फॉरवर्ड करण्यापूर्वी स्वतःला हे विचारा कि हि जर माझी बहिण असती तर? समजा आपण तसे फोटो तयार केले नसतील पण तसे फोटो फॉरवर्ड करून आपण वेगळे काय करत आहोत? जितके दोषी तसा फोटो करणारा आहे तितकेच दोषी आपण पण होऊ जर आपण ते फोटो काहीही विचार करता तसेच पुढे पाठवत राहिलो तर. बघा पटलं तर घ्या... नाहीतर सोडून द्या. कारण असेही मी सांगितले म्हणून हे समाजकंटक असे फोटो पसरवण्याचे थोडीच थांबणार आहेत. पण मी, तुम्ही-आम्ही आपण सगळे किमान असले फोटो मेसेजेस पुढे फॉरवर्ड करून त्याचा होणार जास्तीचा प्रसार तरी थांबवू शकतो ना?  
बघा आज ह्या एका विषयावर नक्की विचार करा. चिंतन करा अन ठरवा येणाऱ्या काळात आपल्याला कसला समाज घडवायचा आहे ते. ह्या लेखातील बऱ्याचशा प्रश्नांना स्वतःच स्वतःला उत्तरे द्यायचा प्रामाणिक प्रयत्न करा. ह्या प्रश्नांना प्रामाणिक उत्तरे देण्याची जेव्हा बहुतेकांच्या मनांची तयारी होईल तोच क्षण येऊ घातलेल्या बदलाची नांदी देणारा ठरेल.  अन तेव्हाच आपण म्हणू शकू नांदी बदलाची... अशीही अन तशीही.

©अभिजित इनामदार
  कामोठे, नवी मुंबई  

Tuesday, 21 June 2016

कारण... तो बाप असतो (कविता)

कारण... तो बाप असतो

दिनांक : १९ जून २०१६

बायको जरी ऑपेरेशन थिएटर मध्ये प्रसूती वेदना सहन करत असली तरी

तिच्या अन होणाऱ्या काळजीने ज्याचा चेहरा काळवंडलेला असतो कारण...

तो बाप असतो

इवलासा जीव समोर आल्यावर, बायकोच्या डोळ्यातलं हसू बघून

जो जगाच्या जागी गद्गदतो कारण....

तो बाप असतो

ऑफिस, कामाचा ताण, वाढणाऱ्या जबाबदाऱ्या ह्या सगळ्यांशी सामना करीत असताना

घरी आल्यावर झोपी गेलेल्या बाळ गोपाळांच्या डोक्यावरून मायेचा हात फिरवतो कारण....

तो बाप असतो

चिमण्या पाखरांना पहिल्यांदा शाळेत सोडताना टिपं गाळणाऱ्या बायकोला समजावताना

उगी काय सारखं सारखं हळव व्हायचं म्हणताना त्याचा स्वर कातर होतो कारण...  

तो बाप असतो

स्कूल बसने जायची सवय नसलेल्या पाखरांना स्कूलबसने जायला लाऊन

त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी बसच्या मागे गाडीवर जाउन स्कूलच्या गेटवर जाउन उभा राहतो कारण... तो बाप असतो

थकून भागून घरी आल्यावर लेकाच्या हट्टापायी

त्याला खांद्यावर बसूवुन फिरवतो कारण...

तो बाप असतो

शाळा, नंतर कॉलेज अश्या एक एक पाहिऱ्या चढणाऱ्या मुलांच्या

पाठीशी जो भक्कम पणे उभा राहतो कारण...

तो बाप असतो

इतरांना काहीच अप्रूप नसलेल्या परीक्षा, स्पर्धा,

यातील मुलांच्या यशाबद्दल भरभरून बोलत राहतो कारण...

तो बाप असतो

लेकीच्या लग्नासाठी, लेकाच्या शिक्षणासाठी कर्ज काढतो

ते फेडण्यासाठी दुप्पट कष्ट करतो कारण...

तो बाप असतो

आपलेल्या झिजलेल्या चप्पलेचा, विरलेल्या शर्टचा जास्त विचार करत बसत नाही

कारण मुलाच्या मुलीच्या आनंदापुढे त्याला बाकी काही नको असते कारण…

तो बाप असतो

आपल्या मुलांबद्दल कोणी काही म्हटलं तर

त्याला बरोबर उत्तर देत असतो कारण….

तो बाप असतो

आता पाखरं नोकरी, करिअर नावाच्या आकाशात भरारी घेत असतात

पण त्याचे दोन मिचमिचे डोळे त्या पाखरांवर नजर ठेऊन असतात कारण...

तो बाप असतो

लेक फॉरेन ट्रीपला जाणार म्हणून त्याचा उर भरून येतो, मुलगा नको म्हणत असतानाही

एअरपोर्टवर फक्त गेट मधून आता जाणाऱ्या मुलाला बघता यावे म्हणून रात्री १.३० - २ वाजेपर्यंत जागतो कारण... तो बाप असतो

आता मुलाला / मुलीला मुलं होतात, ह्यांनी राखलेल्या दुधावर साय चढते

नातवंडांमध्ये रमून सुद्धा मुला-मुलीची काळजी करत राहतो कारण...

तो बाप असतो

आपल्या मुलांचं लहानपण वेळेअभावी न अनुभवता आलेला तो

आता नातवंडांच्या लीला पाहण्यात रमून जातो कारण...

तो बाप असतो

लहानपणी मुलांना अंगाई... गोष्ट सांगणे असे काहीच करू न शकलेला तो

आता नातवंडांना गोष्टी सांगताना थकत नाही कारण...

तो बाप असतो

म्हातारपणी लुकलुकणारी मान सांभाळत श्रीराम श्रीराम म्हणताना सुद्धा

माझ्या मुला-बाळांना सुखात ठेव अशीच प्रार्थना करत असतो कारण...

तो बाप असतो

©अभिजित इनामदार
  कामोठे, नवी मुंबई  

आणि.... नर्मदा मला बोलावीत होती (कथा)

आणि.... नर्मदा मला बोलावीत होती    

लिखाण: अभिजीत अशोक इनामदार

दिनांक : १६ जून २०१६                     

सुबोध आजही दचकुन उठला. घशाला कोरड पडली… तसाच उठला डोक्याशी असलेला पाण्याचा तांब्या उचलला आणि घटाघटा पाणी प्यायला. बाजूलाच त्याची आई पडून होती. पलीकडच्या भिंतीला टेकून पिठवारती एक दिवा ठेवला होता. तो विझू नये म्हणून त्याभोवती एक वीट अन लोखंडी पाटी त्यावर पालथी घालून ठेवली होती. दिवा पेटता होता... हे त्या पाटीखालून येणाऱ्या मिणमिणत्या प्रकाशामुळे कळत होतेच. तरीही सुबोधने पाटी वर करून दिव्यातली वात सारखी केली. तेल घातले. दिवा आणखीनच उजळला. त्याबरोबर समोरची त्याच्या आण्णांची गुलाल बुक्का वाहिलेली अन तुळशीचा हार घातलेली तसबीर उजळून निघाली. हो… सुबोधचे अण्णा श्रीधर पंत आठ दिवसांपूर्वीच निजधामास निघून गेले होते. कसला आजार नाही की काही नाही. गेल्या वर्षी कंपनीतून रिटायर झाल्यापासून जेष्ठ नागरिक संघाचे सदस्य. नेहमीच आपल्या मित्रपरिवारात रमणारे. एक दिवस सकाळी अजून का हे उठले नाहीत म्हणून सुबोधच्या माई उठवायला गेलेल्या अन त्यांच्या हंबरड्यानेच सुबोधला जाग आली. डॉक्टरला बोलावणे वगैरे मानसिक समाधान... आता काही उपयोग नाही हे त्याने ओळखलेच होते.

सगळे सोपस्कार झाले... बघता बघता आठ दिवस झाले. झोप लागत नव्हतीच... त्याने उगाचच कूस बदलून पाहिली. आण्णांची एक ना अनेक रूपं डोळ्यासमोर येत होती. मला बालक मंदिरात नेउन बसवणारे अण्णा, मी व्यवस्थित शिकावे म्हणून प्रसंगी आपल्याला ओरडणारे अण्णा, आपल्याला लागणाऱ्या सगळ्या वस्तू, खाऊ आणणारे, आपले सगळे हट्ट पुरवणारे अण्णा... मला चांगल्या कॉलेजला प्रवेश मिळावा म्हणून झटणारे अण्णा, कॉलेजच्या फी साठी अर्ज काढणारे अण्णा... एक ना दोन किती रूपं आपल्या जन्मदात्याची. मला नोकरीला लागून ३ वर्षे झाली पण त्यांनी माझ्याकडे कधी काही मागितल्याची कुठलीच आठवण नाही.... एकही नाही? असेच अनेक विचार करत तो पडून राहिला. पहाटेच्या सुमारास कधीतरी डोळा लागला त्याचा….

दुसऱ्या दिवशी अण्णांच्या ग्रुपमधील काही लोक सुबोधला भेटायला आले. ह्याआधीही ते सारे येउन गेले होतेच. पण उद्याच्या १० व्याला काही मदत लागणार आहे का ते विचारण्यासाठीच ते आले होते. थोडावेळ थांबून दुसऱ्या दिवसाची रूपरेषा ठरवून ते निघाले. तोच सुबोधने त्यांचे निकटचे स्नेही देशपांड्यांच्याकडे पाहिले अन म्हणाला "काका थोडं बोलायचं होतं." देशपांडे बसले... बाकीचे निघून गेले.

सुबोध म्हणाला "काका मला गेले आठ दिवस स्वप्न पडतायत... मला त्यांचा अर्थ लागत नाहीये. काल सुद्धा पुन्हा तेच स्वप्न पडलं होतं. कसलीतरी अनामिक ओढ वाटत होती कोणीतरी बोलावीत होतं पण कोण तेच कळत नव्हतं. अण्णांची काही इच्छा राहिली आहे का?"

देशपांडे "मला तरी तसे काहीच बोलल्याचं आठवत नाहीये" म्हणाले.

सुबोधला काहीच उलगडा झाला नाही. आता उद्या जर पिंडाला कावळा शिवला नाही तर बघू काय करायचे असे म्हणून विषय सोडून दिला... १० व्याच्या दिवशी सगळे विधी झाले. काही केल्या पिंडाला कावळा शिवला नाही. म्हणून मग वाट बघून बघून शेवटी दर्भाचा कावळा करून त्याने पिंडाचा काकस्पर्श केला. त्याच वेळी सुबोधने अण्णांच्या अस्थि विसर्जन न करण्याचा निर्णय घेतला. त्यांची काय इच्छा राहिलीय ते त्याला शोधायचे होते. अस्थींचे मडके घेऊन घराबाहेरच्या झाडाला बांधून त्याने इतरांचा, नातेवाईकांचा रोष पत्करला होता.

१३ वा १४ वा झाला. सगळी आवरा आवर झाली. अण्णांच्या अस्थि तश्याच बाहेर झाडाला लटकून होत्या. माई सुद्धा सुबोधला सांगून कंटाळल्या. आवरा आवरी करताना सुबोधला आण्णांची जुनी डायरी सापडली. खूप वर्षे अण्णा डायरी नियमित लिहित होते. गेल्या काही वर्षांमधेच त्यांनी ते बंद केले होते. काही पाने चाळता चाळता तो मधेच एखादे पान वाची... त्यासंदर्भातील आठवण ताजी होई... पुन्हा पान उलटले जाई. कित्येक छोट्या छोट्या गोष्टी अण्णांनी मनामध्ये आणि साहजिकच डायरीमध्ये कोरून ठेवल्या होत्या. काही कटू तर काही गोड आठवणींची पाने उलटली जात होती. अन एक पानावर तो थबकला.

अण्णांनी लिहिले होते:

आज आमचा सगळा ग्रुप नर्मदेला भेट द्यायला गेला... नर्मदा परिक्रमेला गेला. सगळ्यांनी बिनपगारी रजा घेतल्या आहेत. माझी सुद्धा खूप इच्छा होती पण गेल्याच महिन्यात सुबोधच्या कॉलेज प्रवेशासाठी कंपनीतून घेतलेल्या कर्जामुळे ते शक्य नाही. मला असणारे ह्या परीक्रमेबद्दलचे वेड आणि मला कायम मनात रुंजी घालणारी नर्मदा. माझ्या वडिलांबरोबर माझ्या लहानपणी मी केलेली ती परिक्रमा अन तेव्हापासून माझ्या मनात असणारी ओढ खरच शब्दात व्यक्त करता येत नाही... कारण ती अनुभवायलाच हवी. खरे तर साहेबांना विचारले असते तर ते नाही म्हणाले नसते कदाचित... पण पण आपला भिडस्त स्वभाव. असो. एकदा हे कर्ज फिटले अन सुबोध्चे शिक्षण झाले की मी निवांतच होणार आहे. मग सुबोधला हक्काने सांगेन मला नर्मदा परिक्रमा घडवून आण म्हणून. आज देशपांडेच्या हातात हात देऊन तेवढी माझ्यासाठी बाटलीभरून का होईना नर्मदा आण म्हणून सांगताना आपला स्वर किती कातर झाला होता. त्याने विचारले सुद्धा अरे श्रीधर काय झाले म्हणून पण मी मानेनेच काही नाही म्हणून सांगितले. जायची इच्छा खूप होती. माझ्या आप्पांच्या खांद्यावर बसून पाहिलेलं ते नर्मदेच पात्र, तिच्या पवित्र पाण्यात स्नान करणारे साधू-संत, परिक्रमा करणारे लोक अन मला साद घालणारी नर्मदा... हे चित्र सहज डोळ्यापुढे उभे राहते…..

पुढे अण्णांनी काही लिहिले नव्हते. काही टिपं गळून पडल्यची साक्ष मात्र डायरीचे ते पान मात्र नक्की देत होते. काहीतरी ठरवल्या सारखे सुबोध उठला माईला हाक मारली अन आपला प्लान सांगितला. माईने बाकी काही विचारण्यापुर्वीच त्याने तिच्यासमोर आण्णांची डायरी धरली. डोळे भरल्या सुबोधचा चेहरा पाहून माईंनी ते पान भरभर वाचून काढले. अन मुकपणेच त्याला अनुमोदन दिले.

सकाळीच आवरून त्याने बाहेर पडताना अण्णांच्या अस्थि व्यवस्थित ब्यागेत ठेवल्या. दारात निरोप द्यायला उभ्या माईला सुबोध म्हणाला "आयुष्यभर त्यांनी कधीच काही मागितले नाही... नेहमीच देत आले. आपली स्वप्न इच्छा... कशाचाच विचार केला नाही. खरेतर अण्णाच मला हे सुचवत होते स्वप्नांमधून, मलाच हे कळायला उशीर लागला. मी उगाच घाबरत होतो त्या स्वप्नांना... खरे तर अण्णांची इच्छा पूर्ण करायची होती आणि म्हणूनच… नर्मदा मला बोलावीत होती.”

©अभिजित इनामदार
  कामोठे, नवी मुंबई  

Friday, 10 June 2016

रिझल्ट (लेख)

रिझल्ट

लिखाण: अभिजीत अशोक इनामदार
दिनांक : ८ जून २०१६

दहावीचा रिझल्ट लागला. अमितला ८१% मार्क्स मिळाले. नेटवरती आपला रिझल्ट त्याने पुन्हा पुन्हा चेक केला. फक्त ८१%? तो स्वतःच अस्वस्थ झाला. त्याला ९२+% ची अपेक्षा होती. अमित तसा सुखवस्तू कुटुंबातील मुलगा. वडील इंजिनिअर, मल्टी न्याशनल कंपनीमध्ये म्यानेजर, आई ब्यान्केमध्ये अधिकारी. श्री. आणि सौ. एकलव्ये यांचा एकुलता एक मुलगा. घरात कुठल्या गोष्टींची कमतरता नाही.

आई वडिलांनी कधीच आपल्याला अभ्यासाचं किंवा रिझल्टच टेन्शन दिलं नव्हतं की कधी एवढेच मार्क्स मिळायला हवेत म्हणून कधी त्याच्या मागे लागले नव्हते. अमित विचार करत होता “आई बाबा नेहमी मी नीट अभ्यास करतो का, मला काही अडचण आहे का, मला काही हवय का हे नक्कीच बघतात... त्यांच्याकडे वेळ नसतो हि बाब सोडली तर काहीच कमी पडू दिलं नाही त्यांनी.. त्यांनी कधी कसल्याच अपेक्षा ठेवल्या नाहीत माझ्याकडून? त्यांनी कधी बोलून नाही दाखवले पण त्यानाही वाटत असणारच ना कि आपल्या मुलाने ९०% पेक्षा जास्त मार्क्स मिळवावेत. त्यांच्या ऑफिस मधील इतर कलीग्जच्या मुलांना मिळाले असतील तसे मार्क्स तर…. त्यांना शरमल्या सारखं होईल का?”

नुकतच मिसरूड फुटलेल्या १६ वर्षांच्या अमितच्या मनात वादळ उठलं होतं. “एवढ सगळ पुरवून सुद्धा तुला मार्क्स मिळाले नाहीत असे जर ते म्हणाले तर?” अमित पुरता खजील झाला. त्यात नुकताच समोरच्या झोपडपट्टीतल्या दीपकने कसल्याही सुविधा नसताना ९१% मार्क्स मिळवले होते त्याची चर्चा बिल्डींगभर होत होती. अमितला अजूनच शरमल्यासारखे झाले. बाबांनी काय काय नाही केले आपल्यासाठी? क्लासला जाण्यासाठी स्कूटर, मार्केटमधील बेस्ट ट्युटोरिअल्स, ब्रांडेड पेन, पेन्सिल, कंपास, खाण्यापिण्याच तर विचारूच नका... आपल्यामुळे आपल्या आई बाबांना लाज येईल? श्या... आपण काहीच कामाचे नाही आहोत.” त्याचा जीव घुसमटला, डोळ्यातून अश्रू वाहू लागले, जीव आफाट दुखावला गेला, स्वतःवरच तो खूप चिडला. “काही तरी करायला हवे... काही तरी करायला हवे... पण नक्की काय करायचे? कशाला जगायचे असे जिथे आपण आपल्या आई वडिलांना हा साधा आनंदही देऊ शकत नसू तर?”

“संपवून टाकू हा जीव... नकोच ते अपेक्षाभंगीत जिणं... काहीच नको”. अमित ताडकन उठला. टेरेसकडे  धावला. कठड्याजवळ उभा राहिला… खोल श्वास घेतला... आता वरती चढायच अन स्वतःला झोकून द्यायचं अन संपवून टाकायचं सगळं. पण एकदम विचार आला, “जर एवढ्या वरून पडून जर जीव गेलाच नाही तर? कायमच अपंग वगैरे झालो तर? तर आई बाबांना अजून त्रास होईल ना?” तो पुन्हा माघारी घरात आला. “त्यापेक्षा विष घेऊ... कोणालाच कळणार नाही. पण घरात विष कुठले? बाथरूम क्लिनर घ्यावे का? नकोच त्याचा वास सहन होत नाही आपल्याला... पिणार कसे? बेस्ट वे... हॉल मधल्या पंख्याला दोरी बांधणे अन लटकणे...” दोरी नव्हती... आईच्या ड्रेसची ओढणी घेतली. स्टूल वरती उभाराहून ओढणीचं एक टोक पंख्याला बांधलं दुसरं त्याचा फास करून, तो गळ्यात अडकवला. ढगफुटी व्हावी तश्या अश्रुधारा त्याच्या डोळ्यातून वाहत होत्या. निर्धाराने त्याने डोळे पुसले. बास झालं आता फक्त पायाखालचा स्टूल ढकलून द्यायचा अन करून टाकायचा शेवट ह्या असल्या जगण्याचा. आई वडिलांची आठवण झाली आणि शेवटचं त्यांना बघून घ्यावे म्हणून त्याने खिशातून मोबाइल काढला. नुकत्याच झालेल्या त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी काढलेला त्या दोघांचा फोटो मोबाइलवर डिस्प्ले पिक्चर होता. त्यांचे प्रसन्न, हसरे चेहरे पाहून त्याचे डोळे भरून आले. त्याने डोळे मिटले... बस एक क्षण... आता स्टूल ढकलणार तोच…. त्याचा मोबाइल किणकिणला... सगळे पाश सोडून जाताना सुद्धा माणसाला निर्धोकपणे जाता येत नाही... तो तर १६ वर्षांचा कोवळा मुलगा होता. त्याने डोळे उघडून पाहिले... नोटिफिकेशन मध्ये आईचा व्हाट्सअप मेसेज होता... मराठीमध्ये काहीतरी लिहिलं आहे. आपले मार्क्स तिला आवडले नसावेत त्याबद्दलच असावा मेसेज... जाऊ दे. पण परत विचार आला काय आहे मेसेज ते तरी पाहू... जीव काय द्यायचाच आहे. त्याने गळ्यातला फास काढला, स्टूल वरून उतरला अन कोचवर बसला.

आई ने लिहिले होते "माझ्या सोन्या अमित, हो.... मला माहित आहे तुला असे म्हटलेलं आवडत नाही... तू मोठा झाल्यास नाही का? पण जर तू नोटीस केले असशील तर तुझ्या लक्षात येईल जेंव्हा मी प्रचंड खुश असते तेव्हाच तुला असे म्हणते. तू म्हणशील हे काय आई आज पत्र टाईप मेसेज वगैरे पाठवतीय... पण सगळ्याच गोष्टी नाही ना रे बाळा बोलून दाखवता येत. त्यात मघाशी तुझा रिझल्ट लागण्याआधी मनात एक अनामिक भीती वाटत होती. जीव घाबरल्यासारखा झाला होता. तुझीच सारखी आठवण येत होती. पण आता मी खूप खूप आनंदी आहे. पण एक सांगू बाळा तो आनंद फक्त तू आणि तूच दिलायास. कारण अरे मी पाहिलेय ना माझ्या अनेक मैत्रीणीना त्यांच्या मुलांना दिवसातून खूपदा फोन करताना, त्यांना अभ्यास करतोय की नाही विचारताना. मी अन तुझे बाबा आम्ही दोघांनीही कधीच असे केले नाही. बर्याचदा रात्री तू अभ्यास करताना तुला कंपनी म्हणून तुझ्या बरोबर जागावे वाटे पण दिवसभराच्या कामाच्या दगदगिने कधी डोळा लागायचा कळायचंच नाही. बाबांचा तर माझ्या आधीच डोळा लेगतो हे तर तुला ठाऊकच आहे. त्यातून बाबा तर बर्याचदा कंपनीच्या कामासाठी बाहेरच गेलेले असायचे. तुला गरजेच्या लागणाऱ्या वस्तू आम्ही देत होतो रे पण तुला द्यायला वेळ नव्हता रे आमच्याकडे. तरीही तू आज जे हे यश मिळवले आहेस ते खूप आनंददायी आहे आम्हा दोघांसाठी.

तुला वाटत असेल इतरांना कसे जास्त गुण मिळाले… अरे आपण पाहतो एकाच झाडाची पाने, फळ एकसारखी नसतात, आपल्या हातांची बोटे एकसारखी नसतात मग सगळ्या मुलांची बुद्धिमत्ता सारखीच कशी असेल? अन मुळात आमच्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचे काय असेल तर ते म्हणजे आपले १००% योगदान अन तू तुझे १००% योगदान दिलेस हे आम्हाला दिसत होते अन म्हणूनच आम्ही खुश आहोत. तुझ्या योगदानाला तू गुणांच्या टक्केवारीच्या कसोटीवर तोलू नयेस असे आम्हाला वाटते.

हे बघ बाळा हा रिझल्ट म्हणजे तुला मिळालेले गुण आहेत तुझी गुणवत्ता नव्हे. अन तुझी गुणवत्ता खूप चांगली आहे हे आम्ही जाणून आहोत. ह्या मार्क्सवरती सुद्धा तुला चांगल्या कॉलेजला अडमिशन मिळेल. मुळात आम्ही तुला कसलीही मदत न करता तू हा एवढा मोठ्ठा टप्पा पार केलास याचंच मुळी आम्हाला कौतुक आहे. आपले आई बाबा आपल्याकडे अजिबात लक्ष देत नाहीत असे जर तुला मनातून वाटत असेल अन तुला आम्हाला सांगता येत नसेल तर काही हरकत नाही आम्हाला जाणीव आहे त्याची. अन तीच मनातील सल भरून काढण्यासाठी हा पत्र प्रपंच.

पण आम्ही तुझ्यासाठीच, आपल्या भविष्यासाठीच ह्या नोकर्या करतो असा बचाव मी करणार नाही. त्यातून लवकरच काहीतरी मार्ग काढायला हवा. तूर्तास तुझ्या अपेक्षांना तुझे आई बाबा खरे उतरले नसतील तर त्याचा राग मनात धरू नकोस. मोठ्या मनाने त्यांना माफ करून टाक.

तुझेच
आई बाबा

ता क. : लवकर तुझी ब्याग भरून ठेव आपण आज रात्रीच मस्तपैकी फिरायला जात आहोत. आम्ही दोघांनीही २ आठवड्यांची सुट्टी काढली आहे. आधी आठवडाभर फिरून येऊ अन मग कॉलेज अडमिशन चे पाहू.

आईचा मेसेज वाचून अमित ढसाढसा रडला... पण त्याच्या मनावरचं असंख्य नकारात्मक विचारांचं ओझं झटक्यात उतरलं.... आईची ओढणी, स्टूल जगाच्या जागी गेले. अन हसत गुणगुणत अमितने ब्याग भरायला घेतली.

दहावीच्या रिझल्ट दिवशीच एकलव्यांच्या फ्यामिलीने अतिशय कठीण असा भावनिक, हळवा अन गुंतागुंतीचा पेपर दिला होता. दैवशक्तीने म्हणा किंवा पूर्वपुण्याईच्या जोरावर म्हणा रिझल्ट मात्र त्यांनी आपल्या बाजूने लावला होता.

©अभिजीत अशोक इनामदार
  कामोठे, नवी मुंबई ४१० २०९

Wednesday, 1 June 2016

विश्रामपूर... आग्रा... विश्रामपूर (मनोगत)

कट्यार काळजात घुसली हे नाटक जरी आपल्यापैकी बर्याच जणांनी पहिले नसले तरी नुकताच आलेला चित्रपट बर्याच जणांनी पाहिला असेल. त्यातील खांसाहेब आणि त्यांची बेगम ही दोन पात्रे जर बोलू लागली तर... माझ्या नजरेतून ते काय बोलतील ह्याचे वर्णन खाली आहे. अर्थात जेव्हा मी “माझ्या नजरेतून” म्हणतो तेव्हा मूळ नाटक, चित्रपटाची कथा ह्याच्याशी त्याचा कसलाही संबंध नाही याची कृपया नोंद घ्यावी.

विश्रामपूर... आग्रा... विश्रामपूर


दिनांक : ३१ मे २०१६
लेखन: अभिजीत अशोक इनामदार

विश्रामपूर: ये कहानी हम किसीको क्यू बताये भला.... किसीको क्या और क्युं दिलचस्पी हो सकती है! हां  हम... हम वही है आफताब हुसैन बरेलीवले... खांसाहेब इस नाम से भी आप मे से कई लोग जानते है हमे| आप के लिये तो हम वही अपराधी है, जीन्होने पंडितजी के साथ धोका किया| उनकी आवाज छीनली| वही अपराधी खांसाहेब... लेकिन क्या आप जानते है की हम अकेलेही गुनेहगार नही थे| गुनेहगार थी वोह दशेहेरेकी वो मेहफिल जिसमे दो कलाकारो को एक दुसरे के खिलाफ खद कर दिया| आपस मे लडाया| आपको क्या लागता है... की जीन पंडित भानुशंकर शास्त्रीने हमे मिरजसे विश्रामपूर बुलाया| रेहनेको छत दिलवायी, हमारी बेटी को संस्कृत पाठशाला मे दाखिला दिलवया उनके बारे में ऐसा कुछ करनेकी सोच भी कैसे सकते थे?
पंडितजी के लिये हमारे दिल मे आदर जरूर था, पर हर साल दशेहरा मेहफिल मे होती हुई हमारी शिकस्त हमे साल दर साल कमजोर बनाती गयी| लेकिन फिर भी हमने कभी पंडितजी का बुरा नही सोचा था| एक बार लोगोंके ताने सून सुनके हमने हमारी जान लेनेकी कोशिश की थी| वोह भी एक कमजोर पल का हमारे सिनेपर किया गया एक वार था| हम अपने आप को संभाल नही सके थे| पर हमारे मन मे सबसे ज्यादा नाराजगी तब हुई जब पंडितजी ने आके केह दिया की "आप एक बार केह देते तो मै राजगायक पद छोड देता!" क्या हमारी गायकी, हमारी मेहनत कुछ भी नही थी की वोह राजगायक पद हमे पंडितजी ने छोडा इसलिये हमे नसीब हो? बेशक इस बात का जवाब “नही” ऐसा ही है| हमारे घराने की गायकी भी लाजवाब थी, है और हमेशा रहेगी| १४ साल हारने के बावजुद हमारे मन में कभीभी पंडितजी को कुछ करने का खयाल तक नहीं आया| हमारी बेगम को तो राजगायक की शानोशौकत, वोह हवेली, वोह पैसा दिख रहा था| हमे अपने घराने की गायकी, हमारे सुरोंकी तारीफ हो... वही काफी था| लेकिन वोह तारीफ दशेहरा मेहफिल की जीत की मौताज थी जो की हमे कतहि पसंद नही था| हमारे घराने की गायकी को उसका सम्मान दिलाने की हमारी कोशिश को बेगमसाहिबा ने राजगायक पद की चाहत समझा| कितनी बडी भूल हो गयी| अगर ऐसाही होता तो हम ऐसा कुछ बहोत पेहले कर बैठते ना की हर साल पंडितजी से मुकाबला करते|
हमे आज भी याद है वोह मेहफिल जिस में पंडितजी गा नही सके थे| पर उस वक्त हमारी बेगम से पंडितजी की आवाज छिनलेने का गुनाह हो चुका है ये हम नही जानते थे| जब हमे वो बात पता चली तब तक देर हो चुकी थी| उस दिन हम बहुत खुश थे की हमारी इतने सालों की मेहनत रंग लायी थी| मगर ये बात सुनने पर तो हमने हमारी जीत का जश्न भी नही मनाया था| ये गुनाह हमारे बेगमसाहिबा ने किया था जो की हमे बिलकुल पसंद नही था| इसलिये हमने उनसे रिश्ता तोड दिया था| हमारे घरानेकी गायकी को जीताने के लिये ऐसा कुछ किया गया ये हमारे समझके बाहर था| पंडितजी को लागा ये हमारी साजिश थी... पर वोह हमारी साजीश नाही थी| बेगमसाहिबा ने कहा के हमारी तकलीफ, हमारा दुख, हमारा दर्द उनसे देखा नही गया और उन्होने ऐसा कर दिया| पर हम जानते है की वोह गुनाह है और कभी माफ नही किया जा सकता|

आग्रा: हम वोही बदनसीब खांसाहेब की बेगम है जिसे कभी कुछ हासील ना हो सका| पेहले हम मिरज से विश्रामपूर आये तो वोह पंडतकी बदौलत. पर खांसाहेब को वोह मान मरातब, शानोशौकत नसीब नही हुई| उनकी नाराजगी वोह कितनी बार भी चाहे पर हमसे छुपा नही सकते थे| उनकी गायगी बिलकुल दुरुस्त थी पर न जानो दरबार में वो किसीको क्यू पसंद नही आ रही थी| हर साल हुई शिकस्त उनको और उदास बनाती गयी| एक बार तो उन्होने अपने आपको खतम करनेकी कोशिश की| हमसे उनकी वोह हालत देखी नही गयी| क्या करती.... प्यार जो करती थी उनसे... मतलब अब भी करती हु पर अब वोह मेरे शोहर नही रहे| हां उनको जीताने के लिये हमने पंडत को सिंदूर खिलाया| हमने सबसे बडा गुनाह किया| और कुछ नही चाहा... वोह जीत जाये... खुश रहे यही एक तमन्ना थी| वोह जीत तो गये पर हमारी जुदाई की किमत पर| हमे दूर कर के वो दुनिया की नजरोंसे खुद को तो बचा सके, पर क्या पता खुदीही कि निगाहों से कैसे बचाते है खुद को|
वो जानते है के ये सब मैने अपने आप के लिये नही किया था| उनका तील तील मरना मुझसे देखा नही गया... और मैने ये गुनाह कर लिया| हां... मै जानति हु के मैने गुनाह किया है| और मै ये भी जानति हुं की उसकी सजा उन्हे नही मीलनी चाहिये| लेकिन वो सिर्फ एकबार प्यारभरी नजरोंसे केह देते की "बेगम आपने हमारे लिये इतना बडा कदम उठाया? इतना इश्क फरमती हो हमसे?" हम तो बस ये सुनने के लीये बेताब थे| वोह ऐसा केह देते तो हमारी हजारो जिंदगानिया उनपर कुर्बान कर देते हम… पर हमारे नसीब ना वो प्यार आया जिसकी हमे ख्वाइश थी| लेकिन उन्होने अपने घराने की गायकी के आगे कभी कुछ सोचा हि कहा? उनके सूर, उनकी गायकी यही उनका नसीब था| हमारे नसीब मे तो तलाखनामा आया| आखिर गुनाह किया है हमने... उनसे इश्क फरमाने का गुनाह, वोह… और उनकी गायकी जीत जाये ये चाहत रखने का गुनाह, उनकी जीत हो इसलिये पंडतकी आवाज छिन लेने का गुनाह... इतने सारे गुनाह किये.... सजा तो मीलनी ही थी|
 
विश्रामपूर: शायद बेगमसाहेबा की आरजू होगी की हम उन्हे केह दे की… “क्यू उन्होने यह गुनाह हमारे लिये किया|” पर वोह हम नही कर सकते| ऐसा कर के हम उन्होने जो गुनाह किया है उसकी हयमियत नही कर सकते| ऐसा करके उन्होने हमारे हुनर, हमारी गायकी को भी शक के कटघरे में लाके खडा कर दिया जो हमे कतही पसंद नही| पंडितजी जब गाये नही... तब उस बात को अपनी जीत ना मानकर हम हमारे १४ सालोकी मेहनत, हमारी गायकी को हराना नही चाहते थे| हमारी बेटी ने हमे मौकापरास्त कहा... जब हमारी बेगम ने गलती की… उसका फायदा हमने उठाया, सदाशीव ने गलती की उसका फायदा हमने उठाया| मगर हमने दोन्होसे गलती करनेकी चाह नही रख्ही थी| पर उसके बावजुद… हमसे हारे हुये सदाशीव को हमने दुसरा मौका दिया| अगर हम उससे, उसकी गायकीसे डरते तो उसे वो मौका हम कतही नही देते| लेकिन हमने वोह दिया|
जब सदाशिव ने हमारे घराने की गायकी का अंदाज चुराया… हमे बहोत तकलीफ हुई उस बात से| सदाशिव को हम कभी मारही नही सकते थे| उसको मारने कि चाह तो सिर्फ और सिर्फ अंदरुनी नाराजगी की वजहसे थी… क्युंकी हम उसके जैसा शागीर्द हमारे घरानेमे बना नही सके| मगर उसकी गायकी सुनकर तो ऐसा लागा की क्यू हम ये अलग अलग घरानोकी गायकी को लेकर बैठ गये| कीस चीज का गुमान जिंदगीभर लेकर बैठे| उसकी गायकीने हमारे अलग अलग घरानोंकी अलग अलग गायाकिके अंदाजकोही सुरंग लगाया| ये हमारी सोच के परे था| इसीलिये उसको अपना शागीर्द बनानेकी उसकी चाह को हमने स्वीकार नही किया| अब ऐसे फ़नकारको हम क्या तालीम देनेवाले थे| पंडितजीकी आवाज जाने की वजह्को भी भरे दरबार में, हमे जिम्मेदार ठहराया गया था| भलेही गुनाह किसी और ने किया था... पर वो हमारे लिये किया था| हमने इतनी बरसो तक जो हमारी पेहचान बनायी थी जो सिर्फ हमारी गायकी कि वजह से थी और ऐसी शखक्सियत को उस दिन भरे दरबार में खुनी बताया गया था| क्युंकी हम सच्छे फ़नकार है और हमारे अंदर का फ़नकार जिंदा है, इसलिये हमने खुदही को सदाशिव के गुरु बनने के लायक नाही समझा| हमने वहा से निकल जाने का फैसला किया|

आज हम सोचते है... हमारी चाह तो सिर्फ इतनीही थी की हमारी घराने की गायकी को सराहा जाय| जो बित गया उसे हम चाह्कर भी बदल नही सकते| लेकिन अगर हम गलत थे तो और भी कई चीजे गलत थी| गलत था वो विश्रामपूर का दरबार जिसने ऐसी प्रतियोगिता रखी| गलत थी वो कटार और उसके इस्तमाल का हक जो जितनेवाले को दिया जाता| गलत था वो अलग अलग घरानोकी गायकी को आपस मे टकराना… जीससे आपस में प्यार और भाईचारे की जगह आपस में रंजिशे मुकम्मल हो|

हमारी इन बातो से हर कोई सहमत हो नही सकता ये हम जानते है, लेकिन हमारी एकही ख्वाइश है के जब जब इतिहास के पन्नो में गायकी का जिक्र हो... तब तब हमारा नाम हमारे घराने की गायकी की वजहसे हो.... ना की पंडित भानुशंकर शास्त्री के आवाज के कातील इस वजह से... क्या ये मुमकिन है?     

©अभिजीत अशोक इनामदार
  कामोठे, नवी मुंबई ४१० २०९